आंगणेवाडीत उसळला जनसागर 

आंगणेवाडीत उसळला जनसागर 

मालवण - श्री भराडी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी आज आंगणेवाडीत भाविकांचा जनसागर लोटला. आई भराडी देवी नमो नमः च्या जयघोषाने आंगणेवाडीचा परिसर दुमदुमून गेला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या भाविकांनी भराडी मातेचे दर्शन घेत नवस फेडले. यात्रेच्या निमित्ताने दाखल झालेल्या भाविकांमुळे आंगणेवाडीनगरी भक्तिमय झाली. 

दिवसभरात कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे आमदार, नेते, मुंबईतील नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनीही देवीचे दर्शन घेतले. 

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने तसेच प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी काल मध्यरात्रीपासून रांगा लावल्या होत्या. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर गेले दोन दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक खासगी वाहने, एसटी, रेल्वेने दाखल होत होते. भराडी देवीच्या मंदिरावर तसेच परिसरात यावर्षी केलेली रोषणाई लक्षवेधी ठरली होती. यावर्षी कुणकेश्‍वर यात्रा प्रथम झाल्याने यात्रेच्या ठिकाणी आकाश पाळणे तसेच अन्य दुकाने थाटण्यास व्यापाऱ्यांना विलंब झाला, तरीही कालच्या दिवसात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली. देवीच्या दर्शनासाठी मध्यरात्री दोन वाजल्यापासून भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे, खासगी वाहनाने जिल्ह्यात दाखल झालेले मुंबईकर चाकरमानी, भाविकही यात्रेच्या ठिकाणी दाखल होत होते. देवीच्या दर्शनासाठी उभारलेल्या पुलावर भाविकांनी रात्रीपासून रांगा लावल्या होत्या. पहाटे तीन वाजल्यापासून देवीच्या दर्शनास सुरवात झाली. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर भराडी देवीस भरजरी साडी तसेच सुवर्णालंकारांनी सजविण्यात आले होते. भाविकांना दर्शन चांगल्यारीतीने होण्यासाठी दहा रांगांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अपंग तसेच अतिमहनीय व्यक्‍तींसाठी (व्हीआयपी) स्वतंत्र रांग होती. पहाटे अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मुखदर्शनाची सुविधाही भाविकांसाठी उपलब्ध करून दिली होती. त्याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. सध्या परीक्षांचा हंगाम सुरू असल्याने याचा काहीसा परिणाम यात्रेवर झाला. सकाळच्या सत्रात भाविकांची गर्दी जास्त नसल्याने देवीचे तत्काळ दर्शन घेता येत होते. दर्शन घेऊन झाल्यानंतर भाविक विविध साहित्यांची खरेदी करून माघारी परतत होते. 

सकाळच्या सत्रात कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना सचिव ऍड. अनिल परब यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, निधी मुणगेकर, पंकज सादये, नागेंद्र परब, शिवराम दळवी, शुभांगी दळवी, गोपाळ दळवी यांसह अन्य जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी भराडी मातेचे दर्शन घेतले. नवस बोलणे, फेडणे तसेच तुलाभार करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळत होते. 

सायंकाळनंतर आंगणेवाडीत भाविकांची गर्दी वाढण्यास सुरवात झाली. एसटी प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. मालवणवरून जाण्यासाठी एसटी बस स्थानक, टोपीवाला हायस्कूल, तारकर्ली, देवबाग, आनंदव्हाळ, सर्जेकोट, मालोंड, मसुरे येथून एसटी गाड्या सोडण्यात येत होत्या. एसटी गाड्यांबरोबर खासगी सहाआसनी, तीनआसनी तसेच अन्य खासगी वाहनांमधून भाविक यात्रेत दाखल होत होते. 

आंगणेवाडीत खासगी वाहनांसाठी तीन किलोमीटर अंतरावर वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आली होती. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांवर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांची पथके कार्यरत होती. काही भाविक देवीचे दर्शन घेऊन पुन्हा मुंबईस माघारी परतताना दिसत होते. 

आंगणेवाडीत यात्रा कालावधीत तसेच अन्य कालावधीत स्थानिक ग्रामस्थांना, भाविकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भासत आहे. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी येत्या काळात उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. 

यात्रेनिमित्त आंगणेवाडीत विविध ठिकाणी हॉटेल्स, मिठाई तसेच विविध गृहोपयोगी साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी पाळणे, मौत का कुआँ तसेच अन्य विविध प्रकारचे खेळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याठिकाणी भाविकांची गर्दी उसळली होती. देवीच्या दर्शनानंतर भाविकांची हॉटेल्स तसेच विविध साहित्य खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाल्याचे चित्र होते. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, विभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेचे देवीला साकडे 
मुंबईत शिवसेनेचा महापौर विराजमान होऊ दे, असे साकडे भराडी मातेस घालण्यात आले आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीत देवीचा चमत्कार निश्‍चितच घडणार आहे. महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने अनेक नगरसेवक हे शिवसेनेच्याच पाठीशी राहतील आणि शिवसेनेचाच महापौर होईल, असा विश्‍वास शिवसेना सचिव ऍड. अनिल परब यांनी या वेळी व्यक्त केला. 

ड्रोन चित्रीकरणाने  दाखविली भव्यता 
भराडी मातेच्या यात्रेची भव्यता भाविकांना पाहता येण्यासाठी यावर्षी प्रथमच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यात आले. हे चित्रीकरण मंदिरासमोर उभारलेल्या सभामंडपात पडद्यावर भाविकांना दाखविण्यात येत होते. हे चित्रीकरण भाविकांचे खास आकर्षण ठरले होते. यात्रेत राजकीय व्यक्तींबरोबरच सिने अभिनेत्यांनी उपस्थिती दर्शवत भराडी मातेचे दर्शन घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com