झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे साहित्यिक संभ्रमात -  अभिराम भडकमकर

झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे साहित्यिक संभ्रमात -  अभिराम भडकमकर

गुहागर -  जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे जीवनशैलीतील बदल झपाट्याने होत असल्याने साहित्यिक भांबावून गेलाय. संवाद, समन्वय संपल्याने प्रत्येकजण स्वतंत्र बेटासारखा झालाय. हे माझे मनन, चिंतन आणि संभ्रम असल्याचे मत संमेलनाध्यक्ष अभिराम भडकमकर यांनी मांडले. ते गुहागरमध्ये साहित्य संमेलनात बोलत होते. 

गुहागरमधील कोकण विभागीय साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन तानाजीराव चोरगे, संमेलनाध्यक्ष अभिराम भडकमकर, पालकमंत्री रवींद्र वायकर, नगराध्यक्ष राजेश बेंडल, जि. प. सदस्या सौ. नेत्रा ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थित झाले.

यावेळी भडकमकर म्हणाले की, बदलाचा वेगामुळे देशात एकाच वेळी लीव्ह इन रिलेशनशीप आणि ट्रिपल तलाक या विषयावर चर्चा होत आहे. जागतिकीकरणातही जातीय अस्मिता ठळक होतात. जगात संपर्क साधताना घरातील संवाद संपतोय. या विसंगतीत मंथनवादी साहित्य एकाच ईझमच्या प्रचाराकडे जाऊ लागलयं. रंजनवादी साहित्य हरवतयं. प्रेरणा आणि शाश्‍वत विचारवादी साहित्याचा परिघ वाढतोय. असमाधानी वृत्तीने पोटाची नेमकी भूकच समजेनाशी झाली आहे.

पाठ्यपुस्तकांमधून साहित्याची गोडी हरवली आहे. वर्तमानपत्रातून समीक्षेऐवजी पुस्तक परिचयाचे मथळे लिहून येतात. इलेक्‍ट्रानिक माध्यमांचा तर साहित्याशी संबंधच नाही. विचारवंतांच्या हत्यांनंतर आविष्कार स्वातंत्र्य आणि पुरोगामी हे शब्दही स्वस्त झालेत. या परिस्थितीत नेमके काय लिहायचे याचा संभ्रम साहित्यिकांमध्ये आहे. माझ्यामते साहित्यक्षेत्रातील हे वातावरण दूर करण्यासाठी संमेलनातून होणारे विचारमंथन उपयोगी पडेल, असेही भडकमकर म्हणाले.

विभागीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभात म.सा.प. गुहागर शाखा आणि ज्ञानरश्‍मी वाचनालयाने प्रसिद्ध केलेल्या रत्नाक्षर या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोकण विभागाचे प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, साहित्यिक नीलिमा गुंटी, उद्धव कानडे, तहसीलदार सौ. लता धोत्रे, संमेलनाचे मुख्य समन्वयक मकरंद अनासपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com