आंबोलीत मोटार दरीत कोसळली; चौघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

अपघातग्रस्त कुटुंबाने मानले पोलिसांचे आभार 
पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले, की संबंधित कुटुंब सुदैवाने बचावले. त्यांना पोलिसांकडून मदतकार्य देण्यात आले. सौ. कानडे यांनी मदत करणाऱ्या पोलिसांचे आभार मानले. 

आंबोली - मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने तब्बल पंचवीस फूट दरीत कोसळून अपघात झाला. यात सोलापूर येथील कानडे कुटुंब सुदैवाने बचावले. मिट्ट काळोखातून एक वर्षाच्या तान्हुल्यासह त्यांनी कसाबसा रस्ता गाठला. हा प्रकार मंगळवारी (ता. 7) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला. यात कुटुंबातील चौघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

येथील घाटाच्या सुरवातीला सावरीचे गाळू येथील धोकादायक वळणावर हा प्रकार घडला. अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या कुटुंबाला मदतकार्य केले. याबाबत अधिक माहिती अशी - सोलापूर येथील रामचंद्र कानडे कुटुंबासह मोटारीतून गोव्याच्या दिशेने चालले होते. आंबोली-कुंभेश्‍वर परिसरात असलेल्या सावराचे गाळू परिसरात धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या गाडीचा प्रकाशझोत डोळ्यांवर बसल्याने त्यांना वळणाचा अंदाज आला नाही. त्यांची मोटार थेट पंचवीस ते तीस फूट दरीत जाऊन कोसळली. गाडीत कानडे यांच्या पत्नीसह दोन मुले होती. यात एक वर्षाच्या मुलाचाही समावेश होता. अपघात झाला, हे कोणाच्या लक्षात आले नाही. मिट्ट काळोखात जखमी अवस्थेत कुटुंब दरीत कोसळले होते. दरीतून त्या अवस्थेत कानडे यांच्या पत्नीने मोबाइलवरून पोलिस कंट्रोल रूमला संपर्क साधला. आमच्या गाडीला अपघात झाला आहे, गाडी दरीत कोसळली आहे, आम्हाला मदतीची गरज आहे, असे सांगितले. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी सहकारी पोलिस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी, हवालदार प्रवीण माने यांना घेऊन आंबोलीकडे धाव घेतली. तोपर्यंत आंबोली पोलिस ठाण्याचे हवालदार कदम, तेली आणि देसाई यांना अपघातस्थळाकडे पाठविण्यात आले. 

मिट्ट काळोखात अडकलेल्या या कुटुंबाने यातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. अवघ्या वर्षाच्या मुलाला घेऊन दरीतून वर यायला सुरवात केली. त्यांनी कसाबसा रस्ता गाठला. त्या ठिकाणी पोलिस पोहोचेपर्यंत दरीतून ते कुटुंब आपल्या मुलांना घेऊन रस्त्यावर आले होते. काही ट्रकचालक आणि परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी आपल्याच व्हॅनमधून सावंतवाडीत दाखल करण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

अशीही पुनरावृत्ती 
या ठिकाणी दीड वर्षापूर्वी एका टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात झाला होता. यातसुद्धा सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती; मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 

अपघातग्रस्त कुटुंबाने मानले पोलिसांचे आभार 
पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले, की संबंधित कुटुंब सुदैवाने बचावले. त्यांना पोलिसांकडून मदतकार्य देण्यात आले. सौ. कानडे यांनी मदत करणाऱ्या पोलिसांचे आभार मानले. 

Web Title: accident in amboli ghat