पोलादपूरजवळील अपघातात जिल्ह्यातील तिघांसह 6 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

पोलिस निरीक्षक जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असून याप्रकरणी आयशर टेम्पोचालक यतीन घाडीगावकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो जखमी अवस्थेत उपचार घेत असल्याने त्यास अद्याप अटक केलेली नाही

पोलादपूर - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लोहारमाळ येथे टेम्पो आणि एसटी बसमध्ये धडक होऊन टेम्पोचालकासह सहा जण जखमी झाले. यात सिंधुदुर्गातील तिघांचा समावेश आहे.

महाडकडून पोलादपूरच्या दिशेने पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जाणारी मुंबई ते रत्नागिरी एसटी बसमधून (एमएच 07 एक्‍स 0304) लोहारे येथे तीन प्रवासी उतरवण्यासाठी थांबली. या वेळी मागील बाजूने मुंबईकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो (एमएच 20 बीएल 3644) यतिन भगवान घाडीगावकर (24, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) हे घेऊन येत होते. टेम्पोची एसटीला मागून धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. टेम्पोचालक यतिन घाडीगावकर, वीरेंद्र दत्ताराम सावंत (24, वर्दे, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) आणि सतीश सदानंद महाडिक (25, फणसगाव, देवगड, जि. सिंधुदुर्ग) तसेच प्रवासी स्वप्नाली नीलेश भिलारे (25) आणि नीलेश विठ्ठल भिलारे (26) तसेच त्याची आई उषा विठ्ठल भिलारे हे जखमी झाले. अपघाताची खबर मिळताच सहायक फौजदार मोकल, पोलिस नाईक पिंगळे तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.
या अपघाताची फिर्याद एस. टी. चालक योगीनाथ इंगळे (35, कर्जाळ, अक्कलकोट, जि.सोलापूर) यांनी पोलादपूर पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिस निरीक्षक जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असून याप्रकरणी आयशर टेम्पोचालक यतीन घाडीगावकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो जखमी अवस्थेत उपचार घेत असल्याने त्यास अद्याप अटक केलेली नाही.

Web Title: accident near poladpur