'अति घाई संकटात नेई' ; चालकाच्या चुकीमुळे पर्यटक मुकला जीवाला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

प्रवाशांनी चालकाला हळू चालविण्याबाबत वारंवार सूचना दिल्या; मात्र चालकाने कानाडोळा केला.

बांदा (सिंधुदुर्ग) : मालवणहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मिनी बसचा (जीए ०३, डब्ल्यू ९३८९) टायर फुटल्याने इन्सुली-डोबावाडी येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. पर्यटक बी. के. योगेश (वय ३२, रा. बंगळूर) असे त्यांचे नाव आहे. अपघातात पाचजण जखमी झाले. हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास झाला. अपघातानंतर चालकाने तेथून पलायन केले.

गोवा पर्यटनासाठी आलेले यूपी, केरळ, बंगळूर, हैद्राबाद, दिल्ली येथील विविध भागातील पर्यटक काल सकाळी सिंधुदुर्ग फिरण्यासाठी मिनीबसमधून आले होते. त्यांनी पणजी येथे गाडीचे बुकिंग केले होते. दिवसभर फिरून ते मालवण येथून सायंकाळी सहाला गोव्यात परतत होते. प्रवाशांनी सांगितले की, मालवणमधून गोव्यात लवकर जाण्यासाठी चालक अत्यंत घाई करत होता. महामार्गाचे काम सुरू असल्याने प्रवासात ट्रॅव्हलने दोन ते तीन वेळा हेलकावे खाल्ले. यामुळे घबराट पसरली. प्रवाशांनी चालकाला हळू चालविण्याबाबत वारंवार सूचना दिल्या; मात्र चालकाने कानाडोळा केला.

हेही वाचा - यावर्षी हंगाम लांबल्याने जिल्ह्याच्या अन्य कोणत्याही किनाऱ्यावर घरटी दुर्मिळ झाली आहेत

 

ट्रॅव्हल झाराप येथे आली असता चालकाने वेग अजून वाढविला. अतिवेगाने टायर फुटण्याची भीती असल्याचे प्रवाशांनी पुन्हा सांगितले; मात्र त्यानंतर काही वेळातच इन्सुली-डोबावाडी येथे गाडीचा टायर फुटून ट्रॅव्हल सुमारे १५० फूट फरफटत रस्त्यालगत जाऊन कोसळली. ट्रॅव्हलच्या पुढील सीटवर बसलेले योगेश काच फुटून गाडीखाली चिरडला गेले. अन्य चौघे गंभीर जखमी आहेत. अन्य वाहन चालक व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडी बाहेर काढले व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी उपचार केले. अपघातात नवीन केन (२०, रा. बंगळूर), आर. संतोष (२३), शाहरुख ऐहेमद (२५), साईनंदन पुता (२५, सर्व रा. हैदराबाद) प्रवासी गंभीर जखमी झालेत.

चालकासह अन्य प्रवासी फरार

अपघात झाल्यानंतर चालकाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्याने अंधाराचा फायदा घेत पलायन केले. ट्रॅव्हलमधील प्रवासी वेगवेगळ्या राज्यातील होते. अपघातात मृत झालेल्या पर्यटकांचे नातेवाईक रुग्णालयात उपस्थित होते. अन्य राज्यातील पर्यटकांनी उपचार करून न घेता तेथून पलायन केले. बांदा पोलिसांनी पंचनामा केला.

हेही वाचा -  ‘प्रचाराची वेळ संपली आहे आणि तुम्ही आता असे चिन्ह दाखवू शकत नाही'

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident in sindhudurg banda one tourist dead in this case