गणवेशासाठी खाते उघडण्याच्या सूचना

गणवेशासाठी खाते उघडण्याच्या सूचना

पैसे थेट जमा होणार - जिल्ह्यातील २८,६१० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

सिंधुदुर्गनगरी - शालेय गणवेश खरेदीत होणारा गैरव्यवहार टाळण्यासाठी व दर्जेदार गणवेश स्वपसंतीने खरेदी करता यावा, यासाठी शासनाने यावर्षीपासून गणवेशाचे अनुदान थेट विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त बॅंक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील २८,६१० विद्यार्थ्यांना बॅंकांमध्ये खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविण्याची योजना शासनाने अमलात आणली. त्यानुसार मागासवर्गीय विद्यार्थी, सर्व मुली आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना (पहिली ते आठवी) गणवेश पुरविण्यात येत होते; मात्र गतवर्षी शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश पुरविण्यासाठी ४०० रुपये एवढे अनुदान प्रत्येक शाळांना पुरविले होते. गणवेश खरेदी करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली होती. मात्र, यामध्ये काही शाळांमध्ये अनियमितता होत असल्याने काही विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाली तरी गणवेश मिळत नव्हते. तोपर्यंत पालकांना स्वतःच्या खर्चाने गणवेश खरेदी करावे लागत होते.

त्यानंतर जुलै, ऑगस्टपर्यंत गणवेश पुरविले जात होते. यामुळे पालकांना गणवेश खरेदीचा भुर्दंड सोसावा लागत होता. मात्र, शासनाने यावर्षीपासून गणवेशासाठीचे ४०० रुपये अनुदान विद्यार्थी व पालक यांच्या संयुक्त खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना बॅंकेत खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी बॅंकेमध्ये खाते उघडलेही आहे.

शासनाकडून प्रत्येक गणवेशासाठी २०० रुपये या प्रमाणे दोन गणवेशांसाठी ४०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या २८,६१० विद्यार्थ्यांना गणवेश अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी शासनाकडून १ कोटी १४ लाख ४४ हजार एवढे अनुदान शिक्षण विभागाकडे प्राप्त होणार आहे; मात्र शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही.

दर्जेदार गणवेश खरेदी शक्‍य
शासनाकडून यावर्षीपासून गणवेशासाठी ४०० रुपये अनुदान थेट खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे पालकांना स्वतःच्या पसंतीने दर्जेदार गणवेश खरेदी करता येणार आहेत. शासनाकडून मिळणारे अनुदान तुटपुंजे असले तरी त्यामध्ये काही रक्कम जादा खर्च करून चांगल्या दर्जाचे टिकावू गणवेश खरेदी करता येणार आहेत. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीकडून खरेदी करण्यात येणारे गणवेश हे मिळणाऱ्या निधीतून खरेदी करावे लागत असल्याने दर्जेदार गणवेश खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते; मात्र शासनाच्या या नव्या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना टिकावू व दर्जेदार गणवेश खरेदी करता येणार आहेत.

गणवेश खरेदीची जबाबदारी पालकांची
शासन निर्णयानुसार गणवेशाचे अनुदान विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट जमा होणार असल्याने आपल्या पाल्याला आवश्‍यक असलेले दोन गणवेश खरेदी करण्याची जबाबदारी पालकांची आहे. गणवेश खरेदीची पावती शाळा मुख्याध्यापकांकडे जमा केल्यावर गणवेशाचे अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com