'या' गावचे लोक का धावू लागले वेशीबाहेर...?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

ग्रामस्थ आपली घरेदारे बंद करून गुरेढोरे कोंबडीकुत्र्यांसह बेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. 

आचरा ( सिंधुदुर्ग ) - निनादणारया चौघड्याच्या आवाजाला भेदत तोफेचा आवाज झाला. गावकऱ्यांना गाव सोडण्याचा इशारा झाला.बारापाच मानकरी यांनी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पहिला दिंडी दरवाजा आतून बंद केला. मंदिराच्या पुढील दरवाजालाही कुलूप ठोकले.नौबत दणाणत होती आणि आचरे ग्रामस्थ आपली घरेदारे बंद करून गुरेढोरे कोंबडीकुत्र्यांसह बेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. गुरेढोरेही जणू या गावपळणीच्या प्रतिक्षेत असल्या सारखीच मालकासोबत वेशीबाहेर जाण्यासाठी हुंदडत निघाली काहींनी होडीचा तर काहींनी गाड्यांमध्ये सामान भरत वेशीची वाट धरली.

आचरा गाव झाला शांत

अवघ्या काही क्षणातच संपूर्ण आचरा गाव निर्मनुष्य झाला आणि गावात उरली फक्त शांतता. आचरे गावचे ग्रामदैवत रामेश्वरावर सर्व घरादाराची जबाबदारी सोपवत ग्रामस्थांनी वेशीबाहेर आपले संसार थाटले आहेत. आता तीन दिवस तीन रात्री केवळ गजबजाट असणार आहे तो वेशीबाहेर राहुट्यांमध्ये. आणि मोबाईल युगात हरवलेले संवाद पुन्हा जुळणार आहेत. 
गावपळणीला आजपासून सुरुवात झाली असून चौथ्या दिवशी रामेश्‍वराचा कौल घेऊन गाव भरणार आहे. कौल न झाल्यास एक दिवस वाढू शकत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. 

हेही पहा - सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी कोणी कोणी केलेत अर्ज ? 

वेशीबाहेर मात्र गजबजाट

शहरीकरणाची साज चढलेले सुमारे आठ हजारांच्या वर वस्ती असणारे बारा वाड्या आणि आठ महसुली गाव असलेले आचरा गाव आज दुपारनंतर सुरू झालेल्या गावपळणीसाठी गावाच्या वेशीबाहेर विसावले आहे. बुधवारपासूनच लांब जाणारया ग्रामस्थांनी गाव सोडण्यास सुरुवात केली होती. आज गावपळणी दिवशी सकाळ पासूनच आचरा तिठ्यावर गाडीने जाणारया ची लगबग वाढली होती. जो तो पळून जाण्यासाठी आतुरला होता. आचऱ्यातील बारावाड्यापैकी ज्या बाजूची वेस जवळची आहे त्याबाजूला वस्ती केली आहे. यात पारवाडीखाडी किनारी भगवंत गड रस्त्यालगत राहुट्या उभारून ग्रामस्थांनी आपले वस्ती स्थाने बनवली आहेत. केवळ राहण्यासाठी आधार एवढ्याच उद्देशाने राहुट्या उभारल्या गेल्या नसुन काहींनी आपल्या कल्पकतेने या राहुट्यांना आकर्षक साज चढविला आहे. 

'गावपळणी' साठी तीन दिवस ग्रामस्थ गेले गावाबाहेर 

संपूर्ण गाव निर्मनुष्य झाला तरी श्री देव रामेश्वराची दैनंदिन पुजा अर्चा सुरू असल्याने या साठी संबंधित गुरव, ब्राम्हण मंदिरात येवून पुन्हा आपल्या निवासस्थानी वेशीबाहेर जातात. दुपारी आणि सायंकाळी मंदिरालगत वाजविला जाणारा चौघडा मंदिराच्या आवारात वाजविला जातो.या साठी आवश्‍यक तेवढेच ग्रामस्थ गावात येऊन पुन्हा वेशीबाहेर जातात; मात्र इतर कोणी तीन दिवस गावात येत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले गेले. 
या गावपळणीचा आनंद घेण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यात तरूणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली आहे. या गावपळणी बद्धल बोलताना मुंबई वरून आलेली दिपाली पारकर सांगते गावपळणीच्या प्रतिक्षेत आम्ही कायम असतो कारण तीन दिवस तीन रात्री विना टेंशन धमाल असते. तर अलिबाग वरून दिपाली सोबत आलेली सुचित्रा धोत्रे सांगते मी प्रथमच गावपळण अनुभवत आहे; पण इथे आल्यावर हे वातावरण खुपच भावले. 

PHOTO : डॉ.बाबासाहेबांच्या लंडन येथील निवासस्थानाची प्रतिकृती उभारतेय इथे...

आचरे गावात पिढ्यान पिढ्या चाललेली गावपळण प्रथेमुळे गाव दर चार ते पाच वर्षांनी निर्मनुष्य होत असल्याने गावाचे वातावरण निरोगी बनण्यास मदत होते, सांडपाणी निचरा होत असल्याने रोगपसरविणाऱ्या अळी डासांचा नाश होतो. यासारख्या या मागच्या अनेक वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे आचरा गावपळण ही धार्मिक मुलामा दिलेली स्वच्छतेसाठी राबविलेली मोहिम म्हटल्यास वावगे ठरू नये. 

हरवलेले संवाद जुळणार 

गावपळणीत 12 ते 14 डिसेंबर पर्यंत गावाच्या वेशीबाहेर रहावे लागणार आहे. 15 ला गावभरण्याचा कौल झाला नाही तर एक दिवस वाढणार आहे. या काळात रानावनात झोपड्या उभारुन किंवा पाहुण्यांचा आधार घेऊन रहावे लागत आहे. सध्याच्या टीव्ही, मोबाईल युगात घरा-घरातले संवाद कमी झाले तर शेजाऱ्यांशी संवाद काय होणार? संवाद हरवल्याने लोक मुकी झाल्यागतच आहेत; मात्र रानावनात राहणाऱ्या ग्रामस्थांना आधार शेजाऱ्यांचा, लाईट नसल्याने टीव्ही नाही, करमणूक केवळ गप्पाच. त्यामुळे गावपळणीत हरवलेले संवाद पुन्हा जुळणार आहेत. यासंवादातून गावचा एकोपा अधिक दृढ होणार आहे. एकंदर उर्जा देणाऱ्या गावपळणीत आचरेवासीय रममाण झाले आहेत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: achara villagers out of village town