सवतकडा धबधब्यात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात यश

राजेश कळंबटे
रविवार, 8 जुलै 2018

रत्नागिरी/राजापूर : येथील सवतकडा धबधब्याचे पाणी अचानक वाढल्यामुळे पर्यटक आतमध्ये अडकले होते. झाडा, झुडपांचा आधार घेऊन पाण्यामध्ये अडकलेल्या त्या पर्यटकांना रत्नदुर्ग माऊंटेनिअरिंगच्या सदस्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत बाहेर काढले. त्यात स्थानिकांसह कोल्हापूर, सांगलीच्या पर्यटकांचा समोवश होता.

रत्नागिरी/राजापूर : येथील सवतकडा धबधब्याचे पाणी अचानक वाढल्यामुळे पर्यटक आतमध्ये अडकले होते. झाडा, झुडपांचा आधार घेऊन पाण्यामध्ये अडकलेल्या त्या पर्यटकांना रत्नदुर्ग माऊंटेनिअरिंगच्या सदस्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत बाहेर काढले. त्यात स्थानिकांसह कोल्हापूर, सांगलीच्या पर्यटकांचा समोवश होता.

गेले काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धबधब्यांसह नद्यांचे पाणी अचानक वाढत आहे. रविवारी सकाळी सवतकडा येथील धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. वर्षा स्नानाचा आनंद घेत असताना हळूहळू पाण्याची पातळी वाढू लागली. काही पर्यटकांच्या लक्षात आले. त्यांनी एकमेकांना बाहेर पडण्यासाठी आरडाओरड केला.

आठ ते दहा जण वाहत्या पाण्याचा सामना करित बाहेर पडण्यात यशस्वी झाले; मात्र पाणी वेगाने वाढले आणि दोन पर्यटक आतमध्येच अडकून पडले. पाण्यातून येण्यास त्यांना संधीच उरली नाही. एका झाडाला धरून ते उभे राहीलेले होते. चारही बाजूने गढूळ पाणी वाहत होते. मुसळधार पावसासह धरणातून पाणी येत असल्याने त्या क्षणाक्षणाला वाढ होती. वाहत्या पाण्याला करंट असल्यामुळे पाय जमिनीवर टिकतच नव्हता. ते दोघेही पर्यटक झाडाचा आधार घेऊन उभे होेते. हा प्रकार घडल्यानंतर किनार्‍यावर आलेल्या सर्वांनी त्यांना वाचविण्यासाठी आरडाओरड करण्यास सुरवात केली. जवळच रॅपलींगसाठी आलेल्या रत्नदुर्ग माऊंटेनिअरिंगच्या सदस्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. दोराच्या साह्याने अडकलेल्या त्या पर्यटकांना बाहेर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

मुसळधार पाऊस थांबतच नव्हता. त्या स्थितीमध्ये त्या दोघा पर्यटकांनी हिंमत दाखविली. तब्बल दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर त्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असाचा प्रकार सवतकडा येथे पाहायला मिळाला.

ते ठरले देवदूत

सवतकडा धबधब्यात अडकलेल्या त्या पर्यटकांसाठी रत्नदूर्ग माऊंटेनिअरिंगचे सदस्य देवदूतच ठरले. त्यामध्ये जितेंद्र शिंदे, गणेश चौगुले, हर्ष जैन, सुरज बावणे, प्रांजली चोप्रा, विक्रम चौगुले यांचा समावेश होता.

Web Title: Achieving success in bringing out the tourists trapped in the Waterfall