रत्नागिरी पालिकेने दाबले महावितरणचे नाक 

राजेश शेळके
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - कोणतेही सहकार्य न करणार्‍या महावितरणचे  पालिकेने नाक दाबले आहे. शहरातील महावितरणची कार्यालये, वसाहतीतील सर्व पाणी जोडण्या तोडल्या आहेत.

रत्नागिरी - कोणतेही सहकार्य न करणार्‍या महावितरणचे  पालिकेने नाक दाबले आहे. शहरातील महावितरणची कार्यालये, वसाहतीतील सर्व पाणी जोडण्या तोडल्या आहेत. शहरातील रस्त्यावरील विद्युत खांब, डीपी आणि शीळ जॅकवेलवरील रखडलेला एक्स्प्रेस फिडर असे अनेक प्रश्‍न महावितरण बरोबर बैठका होऊनही सुटलेले नाहीत. पालिकेच्या या फंड्याने महावितरणचे तोंड उघडणार का, असा प्रश्‍न आहे.  

पालिकेच्या पाणी विभागाने आजच ही कारवाई केली. नाचणे येथील मुख्य कार्यालय, कर्मचारी वसाहत, हार्बर, डीएसपी कार्यालय आणि मुख्य हायवेवरील कार्यालयाच्या नळ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी ही माहिती दिली.

पालिका आणि महावितरण कंपनी यांच्यातील समन्वयाने शहरातील विविध प्रश्‍न सोडविणे शक्य आहे. मात्र रत्नागिरीत या दोघांत शितयुद्ध पेटले आहे. रस्त्यांमध्ये महावितरणचे अनेक विद्युत खांब आहे. डीपीही रस्त्यात आहेत. ते हलविण्यासाठी पैसेही भरले आहेत. आमदार उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच याबाबत बैठक झाली. तत्काळ या विषयांवर अंमल व्हावा, अशा सूचना करूनही महावितणकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. अनेक वर्षांपासून ही कामे खितपत पडली आहेत. शीळ जॅकवेलवर एक्स्प्रेस फिडर बसविण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शहरातील पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता येते. महावितरणच याला कारणीभूत आहे. त्यांना धडा शिकविण्यासाठीच आम्ही त्याच्या नळ जोडण्या तोडल्या आहेत, अशी माहिती नगराध्यक्षानी दिली. 

राहाटघर उपकेंद्राचे काम निकृष्ट-कुचकामी

राहाटघर येथील विद्युत उपकेंद्र कार्यान्वित होऊन वर्ष झाले. तरी अजून ते सुरू झालेले नाही. ठेकेदाराने या उपकेंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. त्यामुळे हे केंद्र शहरासाठी कुचकामी ठरत आहे, असा आरोपही नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केला. 

Web Title: action of Ratnagiri corporation on Mahavitarn Office