पालीतील ग्रामीण भागात प्लास्टिक वापरावरील कारवाईस सुरवात

Action Started Against Plastic Use in Pali
Action Started Against Plastic Use in Pali

पाली : शासनाने 30 मार्च 2018 पासून महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली. मात्र, अनेक ठिकाणी प्रामुख्याने ग्रामीण भागात प्लास्टिकबंदी कायद्याचे उल्लंघन करुन सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. पाली बाजारपेठेतील एका दुकानावर महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ रायगड व पाली ग्रामपंचायत यांनी मंगळवारी (ता.23) टाकलेल्या संयुक्त धाडीमध्ये पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्लॅस्टिक बंदी कायदा व नियमांचे उल्लघन केले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने ग्रामीण भागातील कारवाई सत्रामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. पालीतील निर्मल लक्ष्मी गारमेट या दुकानात धाड टाकून प्लास्टिक पिशव्या जप्तीसह पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लास्टिक बंदीबाबत कारवाई होत असल्याची बातमी कळताच दुकानदारांची पळापळ झाली. अनेकांनी दुकानांचे शटर लावून दुकाने बंद केली. 

प्लास्टिकबंदीनंतर प्लास्टिक पिशवीला कापडी पिशवीचा पर्याय आला. मात्र, प्लास्टिकबंदीची घोषणा होउन कित्येक महिने उलटले तरी बाजारात प्लास्टिक पिशव्यांची देवाणघेवाण दिसून येत होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्लास्टिकबंदीची बेधडक व दंडात्मक कारवाई झाल्याने दुकानदार व व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे. सदरची कारवाई साळुंके, (प्रादेशिक अधिकारी रायगड), वाघमारे (उपप्रादेशिक अधिकारी रायगड), मालवेकर (क्षेत्र अधिकारी) यांनी केली आहे.

यावेळी पाली पोलिस उपनिरिक्षक एन.डी.चव्हाण, पाली ग्रामपंचायत सरपंच गणेश बालके, उपसरपंच विजय मराठे, ग्रा.पं. सदस्य अजय मुळे, भास्कर दुर्गे आंदिसह ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश गडगे, रुपेश साळंके आदि सहभागी झाले होते. 

''पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी राज्य सरकारने हा कायदा लागू केला असून, प्लास्टिकबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर रोख दंडात्मक कारवाईसह शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांनी तसेच व्यापार्‍यांनी प्लास्टिकबंदी कायद्याचे पालन करावे व पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्यास योगदान द्यावे''.

- साळुंके, प्रादेशिक अधिकारी, रायगड 

''महाराष्ट्र राज्य सरकारने प्लास्टिक बंदी कायदा लागू केला आहे. पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास व हाणी रोखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा व उपयुक्त मानला जातो. प्लास्टिकबंदी कायद्याचे उल्लंघन न करता व्यापारी वर्गासह नागरिकांनी प्लास्टिक मुक्तीसाठी पुढाकार घ्यावा''.

- गणेश बालके, सरपंच, ग्रामपंचायत पाली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com