Loksabha 2019 : लोकसभा निवडणूक एक आठवड्यावर; प्रचारासाठी कार्यकर्त्यांचे जिवाचे रान

अमित गवळे 
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पाली : लोकसभा निवडणूक एक आठवड्यावर असताना आघाडी व युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. सध्या छोट्या छोट्या गाव बैठका आणि गृहभेटींवर अधिक भर दिला जात आहे.

लोकसभा 2019
पाली (जि. रायगड) : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांची अटीतटीची लढत आहे. त्यामुळेच आघाडी व युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. सध्या छोट्या छोट्या गाव बैठका आणि गृहभेटींवर अधिक भर दिला जात आहे.

या निवडणुकीत एकेक मत निर्णायक ठरणार आहे. परिणामी गाव-खेड्यात गाव बैठकांवर अधिक भर दिला जात आहे. उन्हाची काहिली असल्याने संध्याकाळी व रात्री गाव बैठकांचे आयोजन होत आहे. कुणा कार्यकर्त्याच्या घरी, गावातील मंदिर किंवा समाज मंदिरात सर्व मंडळी जमतात आणि स्थानिक नेते त्यांना मार्गदर्शन करतात. प्रचाराची आणि मतदान कसे करावे याची व्यूहरचना आखली जाते. गावाबाहेर गेलेल्यांना मतदानासाठी आणण्याची व्यवस्था केली जाते. प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे देखील मतदारांना आपआपल्याकडे आकृष्ट केले जात आहे. नाराज कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे रुसवे-फुगवे काढले जात आहेत. मतदार देखील आपल्या स्थानिक समस्या व मागण्या संबंधीत पुढारी व नेत्यांकडे सांगत आहेत.

pali

आदिवासी वाड्यावस्त्या देखील कार्यकर्ते सध्या पिंजून काढत आहेत. शहराच्या ठिकाणी छोट्या रॅल्या काढल्या जात आहेत. प्रचाराचे आणि कामाचे नियोजन शिस्तबद्धपणे सुरू आहे. जाहीरनामा आणि विकासकामांच्या माहितीपत्रकांचे प्रचार प्रसारादरम्यान वाटप केले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक असूनही या निवडणुकीला मोठी रंगत आली आहे.

pali

pali

pali


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Activists are taking village meetings and house to house for campaigning for loksabha election 2019