राष्ट्रवादी-मनसे आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

खेड - खेड पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व मनसे एकत्र आले, तरीही मनसेला नगराध्यक्षपदासह अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीला मात्र चार जागा मिळाल्या. शिवसेनेने दहा जागांवर विजय मिळवत पालिकेची सत्ता हाती घेतली. वैभव खेडेकर हे स्वकर्तृत्वावर निवडून आले. या साऱ्याचे विश्‍लेषण करताना मनसेशी केलेल्या आघाडीचा फायदा फक्त राष्ट्रवादीला झाला. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते आघाडीबाबत नाराज असून आगामी निवडणुकीत आघाडी झाल्यास त्याची किंमत दोन्ही पक्षांना मोजावी लागेल.

पालिकेतील सत्ताधारी पक्षांशी युती करीत राष्ट्रवादीने आपली पोळी भाजून घेतली; मात्र याचा परिणाम असा झाला, की शहरातील मनसेचे कार्यकर्ते दुखावले गेले. काहींनी तर भाजपच्या तिकिटावर आघाडीच्या विरोधात निवडणूक लढविली. पालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आपली चिन्हे बासनात ठेवूनही शिवसेनेची घोडदौड रोखता आली नाही. ही एकप्रकारची नामुष्कीच आहे. असे असतानाही आगामी निवडणुकीत पुन्हा आघाडी होण्याची लक्षणे पाहिल्यावर ग्रामीण भागातील राष्ट्रवादी व मनसेचे नाराज कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. गेल्या काही दिवसांत चिंचघर वेताळवाडी, पवारवाडी, सुर्वेवाडी, दिवाण खवटी येथील राष्ट्रवादी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. येत्या काही दिवसांत दस्तुरी, भडगाव-खोंडे, लोटे परिसरासह पंधरागाव पट्टा व चाळीसगाव पट्ट्यातील नाराज कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ही आघाडी दोन्ही पक्षांना मारक ठरली आहे. आजही तळागाळात शिवसेनेची बांधणी चांगली आहे. राष्ट्रवादीची बांधणी तितकीशी मजबूत नाही. 

ग्रामीण भागात काही प्रमाणात झालेली मनसेची बांधणी ढासळत असून आघाडी झाली तर घसरणीत भर पडणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आघाडी झाल्यास दोन्ही पक्षांना त्यांची किंमत मोजावी लागेल, असा निष्कर्ष काढला जात आहे.

आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आघाडी
काही वर्षापूर्वी मनसेचे मुख्य कार्यालय फोडून काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यावर वैभव खेडेकर यांच्या समर्थकांनी आमदार संजय कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर घरफोडीसारखे गंभीर आरोप केले. यामुळे दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या. आज ते कोर्टात खेटे घालत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राजकीय स्वार्थापोटी झालेली आघाडी आम्हाला मान्य नाही, असा शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी व मनसेच्या कार्यकर्त्यांचा सूर आहे.

Web Title: activists diturb by emponcp-mns aghadi