ग्रेटच ! 'हा' डॉक्टर असलेला मराठमोळा अभिनेता बनलाय कोरोना योध्दा...

Actor Dr Ashish Gokhale become a corona warrior
Actor Dr Ashish Gokhale become a corona warrior

गुहागर - वेळणेश्र्वरमधील डॉ. ध्रुव गोखलेंचा मुलगा अभिनेता डॉ. आशिष गोखले लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात पूर्ण वेळ कार्यरत आहे. पेशाने डॉक्टर, आवड म्हणून अभिनय करणारा, सामाजिक बांधिलकीपोटी झोपडपट्टीतील मदतकार्यात सहभागी होणारा डॉ. आशिष आज कोरोना योध्दा म्हणून चर्चेत आहेत.

हिंदी चित्रपटात अक्षयकुमार सोबत त्यांने केले काम

वेळणेश्र्वरमधील डॉ. ध्रुव गोखले यांचा मुलगा म्हणून आशिष गोखले गुहागर तालुक्याला परिचित आहेत. संपूर्ण कुटुंब वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत अशी गोखले कुटूंबाची ओळख. डॉ. आशिषला अभिनयाची आवड असल्याने वैद्यकिय शिक्षणानंतर मुंबईत गाठली. अर्थाजनासाठी एका खासगी रुग्णालयात तो काम करु लागला. त्याचवेळी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी तो ऑडीशन देत होता. 2015 मध्ये कुंकूम्‌ भाग्य या मालिकेतून त्यांने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. गब्बर इज बॅक या हिंदी चित्रपटात अक्षयकुमार सोबत त्यांने काम केले आहे. काम मिळू लागल्यावर दिवसा चित्रीकरण आणि रात्री रुग्णालय असे त्यांचे वेळापत्रक होते. कालांतराने आशिषने चित्रपटसृष्टीत जम बसविला. मोगरा फुलला या मराठी चित्रपटातून काम करणारा आशिष सध्या तारा ऑफ सातारा मध्ये वरुण मानेची भूमिका साकारत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देशात लॉकडाऊन जाहीर केला. तेव्हापासून आशिष डॉक्टरांच्या भूमिकेत शिरला आहे. सध्या आठवड्यातील ७ दिवस २४ तास डॉ. आशिष गोखले रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. याशिवाय अंधेरी ते बोरिवली या परिसरातील कोरोना पसरलेल्या झोपडपट्टीत आपल्या मित्रांसोबत शिधा, स्वच्छ पाणी, साबण, मास्क आणि औषधांचे वितरण करण्याचे कामही डॉ. आशिष करत आहे.

सामान्य माणसांच्या आयुष्यात डॉक्टर रिअल हिरो 

याबाबत डॉ. आशिष म्हणाले की, वैद्यकिय क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा माझे आई, वडिल, बहिण आहेत. लहानपणापासून आईवडीलांना वैद्यकिय क्षेत्रात तळमळीने काम करताना पाहिले. डॉक्टरांबद्दल असलेली श्रध्दा रुग्णांच्या डोळ्यात मी पाहिली आहे.  सामान्य माणसांच्या आयुष्यात डॉक्टर रिअल हिरो असतो हे देखील मी अनुभवलयं. त्यामुळे या क्षेत्रापासून मी दूर जावू शकत नाही. अभिनय हा माझ्या आवडीचा विषय आहे. या क्षेत्रात नाव कमावयचं हे आधीपासूनच ठरवल होत म्हणून तर मी मुंबईत आला. दोन्ही कामातून कायम समाधान मिळात असल्याने कामाचे श्रम कधीही मला जाणवलेले नाहीत.
आपल्या देशातील लोकांमध्ये सर्वाधिक प्रतिकारशक्ती असल्यामुळे कोरोनाच्या संकटातून आपण लवकर बाहेर पडू. मात्र त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, स्वच्छता बाळगणे, व्यायाम करणे आदी सूचना काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. असेही आशिषने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com