जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांमुळेच रत्नागिरीत काँग्रेसची वाईट अवस्था

जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांमुळेच रत्नागिरीत काँग्रेसची वाईट अवस्था

लांजा - निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ज्या नेत्यांनी रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष केले तेच त्यांना आता पदावरून हटवा म्हणून मोर्चेबांधणी करीत आहेत. निष्ठावंतांना विरोध करून आपल्या मर्जीनुसार पक्ष चालविणाऱ्या जिल्ह्यातील या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी काय योगदान दिले हे सर्वश्रुत आहे. पक्षाने आमदार - खासदार करूनही पक्षाची दारुण अवस्था होण्याची दुर्दैवी वेळ जिल्ह्यात वावरणाऱ्या या वरिष्ठ नेत्यांमुळेच झाली असल्याची टीका काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि जेष्ठ काँग्रेस नेते अँड. सदानंद गांगण यांनी पत्रकार परिषदेत केली. 

खासदार हुसेन दलवाई, आमदार हुसनबानू खलिफे यांच्यावर त्यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. श्री. गांगण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बांदिवडेकर यांच्यासाठी आग्रही राहिलेल्या या नेत्यांनी ऐन निवडणुकीत प्रचारातील सहभागच काढून घेऊन त्यांना एकाकी केले. हुसेन दलवाई यांनी तर मतदारसंघात कोणालाही विश्वासात घेतले नाही. तसेच ते प्रचारात देखील सक्रिय झाले नाहीत. उमेदवार चांगला असूनही, त्यांचे विचार चांगले असूनही केवळ नियोजनबद्ध प्रचार केला नसल्यानेच काँग्रेसला लाजिरवाणी हार पत्करावी लागली. नवीन उमेदवाराचा विश्वासघात यांनी केला. आम्हाला इतरांची गरज नाही, असे म्हणणाऱ्यांची मते गेली कुठे हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

गांगण म्हणाले की, काँग्रेस पक्षाची ताकद मजबूत होण्यासाठी माजी आमदार रमेश कदम यांना ज्यांनी जिल्हाध्यक्ष बनविले तेच आता त्यांना पदावरून काढण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. जिल्हाध्यक्ष पदासाठी पाच निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यांना या नेत्यांनी विरोध केला. निष्ठावंतांपैकी या पदासाठी कोणी लायक नव्हते का?

श्री. गांगण म्हणाले, विधानपरिषदेच्या काँग्रेसच्या आमदार हुसनबानू खलिफे यांनी राजापूर लांजामध्ये स्वतःची ३५ हजार मते आहेत असे सांगून ज्यांची पाच हजार मते आहेत त्यांना पक्षात घेण्याची गरज नाही असे वरिष्ठांना सांगून पक्षात येणाऱ्या चांगल्या लोकांना विरोध केला. मात्र लोकसभा निवडणुकीत राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी दहा हजार मते मिळाली. मग ३५००० मते ज्यांची वैयक्तिक होती ती कुठे गेली हे सर्वप्रथम त्यांनी कार्यकर्त्यांना सांगावे ? खासदार हुसेन दलवाई लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात कितीवेळा पक्ष प्रचारासाठी आले, त्यांनी काय नियोजन करून काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले ? केवळ वरिष्ठांना खोटी माहिती पुरवायची आणि आपला स्वार्थ साधून घ्यायचा यापलीकडे या नेत्यांनी जिल्हासंघटनेसाठी काहीही केलेले नाही. याउलट निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम त्यांनी केल्याचे श्री. गांगण म्हणाले.

यापुढे काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच योग्य ते निर्णय घ्यावेत. हुसेन दलवाई यांनी एकतरी विधायक काम या जिल्ह्यात आणले काय? खलिफे यांनीही लांजा राजापूर तालुक्यात ठळक आणि चिरकाल टिकणारे काम करून दाखविले काय? दोघांनाही फुकटची पदे मिळाल्याने पक्ष संघटनेची त्यांना गरज वाटत नाही. ज्यांनी पक्षात आयुष्य काढले त्या निष्ठावंतांवर सातत्याने अन्याय आणि बाहेरून आलेल्याना पदे मिळाली यामुळेच पदांची किंमत त्यांना नसल्याने पक्षाचे महत्व त्यांच्या लेखी कमी आहे. आमदार खासदार असताना जिल्ह्यात पक्ष खिळखिळा करण्याचे काम या नेत्यांनी केले, असेही गांगण म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com