आदित्य ठाकरे म्हणाले, भास्कर जाधव यांच्या प्रचाराला येणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

गुहागर - ""माजी आमदार भास्कर जाधव यांच्या प्रचाराला आणि विजयी मेळाव्यात मी पुन्हा येईन,'' असे मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुहागरमध्ये व्यक्त केले. त्यामुळे गुहागरमधील जागेवरून शिवसेना - भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गुहागर - ""माजी आमदार भास्कर जाधव यांच्या प्रचाराला आणि विजयी मेळाव्यात मी पुन्हा येईन,'' असे मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुहागरमध्ये व्यक्त केले. त्यामुळे गुहागरमधील जागेवरून शिवसेना - भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जनआशीर्वाद यात्रेत चिखलीतील मेळाव्यात ठाकरे यांनी हे संकेत दिले. याच मेळाव्यात पर्यावरणमंत्री रामदास कदमांनीही जाधवांच्या प्रचारासाठी मी पुन्हा गुहागरला येणारच असल्याचे सांगितल्यामुळे गुहागर विधानसभा भास्कर जाधव लढवणार हे निश्‍चित झाले आहे. 

जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ म्हणून युतीच्या जागा वाटपात गुहागर भाजपकडे राहील, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते करत होते. गणेशोत्सवादरम्यान भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून स्वगृही परतण्याचे संकेत दिले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले तर गुहागरमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले. याचा अर्थ गुहागर विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळणार आणि जाधव शिवसेनेतर्फे उभे राहणार असा होतो. त्यामुळे गुहागर भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना 2009 मध्ये याच ठिकाणी भाजपमुळे पराभूत व्हावे लागले होते. याची सल अनेक शिवसैनिकांमध्ये आहे. म्हणूनच गुहागरमधील शिवसैनिक ही जागा मिळवण्याचा हट्ट धरत आहेत; मात्र दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी जागा वाटपाचा निर्णय येईपर्यंत थांबावे असा सबुरीचा सल्ला वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात येत आहे. या परिस्थितीत गुहागर दौऱ्यात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भास्कर जाधवांच्या प्रचाराला पुन्हा येणार असे सांगितल्याने या जागेवरील उमेदवार भास्कर जाधवच असतील यांचे संकेत मिळाले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray comment on Bhaskar Jadhav