कामचुकार ग्रामसेवकांच्या विषयावरून जुंपली..विविध मुद्द्यांवर ताशेरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

काही ग्रामसेवकांच्या सुमार कामगिरीमुळे ग्रामीण भागातील विकास ठप्प होत असल्याकडे सदस्य सदाशिव ओगले यांनी लक्ष वेधले. ग्रामसेवक चांगला असल्यास गावचा विकास होतो, असे सांगून ग्रामसेवकांच्या कामगिरीवर ताशेरे ओढले.

देवगड (सिंधुदुर्ग) - कामचुकार ग्रामसेवकांच्या विषयावरून येथील पंचायत समिती मासिक सभेत सदस्य आणि प्रशासनात आज जुंपली. चर्चेतील विविध मुद्यांची सांगड घालीत ग्रामसेवकांच्या कामगिरीवर सदस्यांनी ताशेरे ओढताच उग्दिग्न होत गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांची बाजू लावून धरत विषयाचे खंडण केले. सरसकट सर्वच ग्रामसेवकांना दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे नमूद करून कोरोनामध्ये ग्रामसेवकांनी चांगली कामगिरी केल्याची पुस्ती गटविकास अधिकाऱ्यांनी जोडली. चांगल्या कामाचे कौतुक होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्‍त केली. 

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुनील पारकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झाली. उपसभापती अमोल तेली, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रूपाली पाटील, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहायक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण उपस्थित होते. काही ग्रामसेवकांच्या सुमार कामगिरीमुळे ग्रामीण भागातील विकास ठप्प होत असल्याकडे सदस्य सदाशिव ओगले यांनी लक्ष वेधले. ग्रामसेवक चांगला असल्यास गावचा विकास होतो, असे सांगून ग्रामसेवकांच्या कामगिरीवर ताशेरे ओढले.

अन्य सदस्यांनी साथ देताना काही ग्रामसेवक जाग्यावरच नसल्याचे सांगितले. विकासात्मक प्रश्‍नांची सोडवणूक होण्यासाठी गाव पातळीवर पंचायत समिती सदस्यांची मदत घेणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. 294 पैकी 65 ताडपत्रींचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती समोर येताच ग्रामसेवकांनी याची माहिती दिली नसल्याचे सांगून नाराजीचा सूर आळवला. प्रशासनाच्या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत येत नसल्याचे सदस्यांनी सांगितले. 

ग्रामसेवक का लक्ष्य? 
पंचायत समितीच्या सभांमधून वारंवार ग्रामसेवकांना लक्ष्य केले जात असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी नमुद करून भावना तीव्र शब्दात मांडल्या. तक्रारदार ग्रामसेवकांना देवगड तालुक्‍यात पाठवता कशाला? असा प्रश्‍न सदस्य ओगले यांनी उपस्थित केला. पंचायत समिती कृषी विभागाबाबतही चर्चा झाली. शिक्षक मुख्यालयी राहिल्यास शाळा सुरू करण्यात अडचणी येणार नसल्याचे सुचवण्यात आले. दरम्यान, तळवडे धबधब्याजवळ मंजूर ठिकाणाऐवजी काही अंतरावर चेंजीग रूम बांधली जात आहे. त्यामुळे कामाला स्थगिती देण्याची मागणी सदस्य अजित कांबळे यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration and Panchayat Samiti meeting devgad konkan sindhudurg