Ratnagiri Dam Mishap : त्यांना सांगितलं होतं; वेळीच ऐकलं असतं तर...?

निवेदन.jpg
निवेदन.jpg

चिपळूण : धरण दुरुस्तीसाठी तिवरे ग्रामस्थ, परिसरातील कार्यकर्ते व मी स्वतः पाठपुरावा करीत होते. निवेदन दिल्यानंतरही पाटबंधारे विभागाचे अधिकारी दाद देत नव्हते. त्यांनी धरणाची पाहणी केली. मे महिन्यात दुरुस्ती झाली. या तकलादू दुरुस्तीमुळे अखेर धरण फुटले. वेळीच योग्य डागडुजी केली असती, तर ही दुर्घटना घडली नसती. त्यामुळे सरकारने मृतांच्या नातेवाइकांची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी सभापती पूजा निकम यांनी जलसंपदामंत्री गिरीश बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

तिवरे धरणाच्या भिंतीला दोन वर्षापूर्वीच गळती लागली होती. ही गळती न काढल्याने दुसऱ्या वर्षी ती वाढली. परिणामी वेळोवेळी पाटबंधारे विभाग व प्रशासनाला कळवून देखील याची गंभीर दखल घेण्यात आली नाही. परिणामी धरण फुटल्यानंतर 23 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेस जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत देऊन त्यांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. 

तिवरे धरण फुटल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश बापट यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालय व तिवरे गावास भेट देत मदतकार्य व समस्यांचा आढावा घेतला. यावेळी सभापती निकम यांनी जलसपंदामंत्र्याना निवेदन देत कैफियत मांडली. सभापती निकम म्हणाल्या, त्यांना तातडीची मदत देऊन शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे, तरच त्या कुटुंबाला आधार मिळेल. 

बेदरकारांचा वावर धरण परिसरात 
चिपळूण तालुक्‍यातील डेरवण, असुर्डे निर्मळवाडी, कळवंडे, खोपड व अन्य धरणांची परिस्थिती नाजूक आहे. धरणांच्या भिंतीवर झाडे-झुडपे वाढली आहेत. धरणांच्या सुरक्षेसाठी कोणत्याच धरणावर सुरक्षारक्षक दिसून येत नाही. त्यामुळे अज्ञात बेदरकार लोकांचा वावर धरण परिसरात वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक धरणावर सुरक्षरक्षक नेमण्यात यावेत. परिसरातील धरणांची पाहणी करून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी निकम यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com