
उत्तर खंडामध्ये या कालावधीत बर्फवृष्टी होऊन संपूर्ण भागावर बर्फाचे अच्छादन असते
रत्नागिरी - कोकणातील कमी-जास्त होणाऱ्या थंडीच्या हंगामाचा फायदा उठविण्यासाठी युरेशियासह उत्तर खंडातील "सी गल' (समुद्र पक्षी) यांचे थवेच्या-थवे समुद्र किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. या पक्ष्यांच्या थव्यांनी किनारे फुलले असून या पक्ष्यांना पाहण्याची पर्यटकांना पर्वणी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराजवळील भाट्ये समुद्रकिनारी हे पक्षी मोठ्या संख्येने दिसत आहेत.
उत्तर खंडामध्ये या कालावधीत बर्फवृष्टी होऊन संपूर्ण भागावर बर्फाचे अच्छादन असते. उपजीविकेच्यादृष्टीने तेथील "सी गल' स्थलांतरित होऊन सुमारे 4 हजार किमीचा प्रवास करून कोकणात दाखल होतात.
अगदी अंटार्टिकपासून पृथ्वीतलावरील अनेक भागात हे पक्षी आहेत. ते समुद्राचे खारे पाणी पिऊ शकतात. त्यांच्या शरीरामध्ये काही खास ग्रंथी शरीरातील जास्तीचे मीठ काढून टाकतात. सी गल हे थव्यामध्ये राहताना ज्यामध्ये काही जोड्या किंवा दोन हजार पक्षी असू शकतात.
उत्तर खंडामध्ये नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणात थंडी आणि बर्फवृष्टी होते. संपूर्ण भागावर बर्फाचे आच्छादन असते. त्यामुळे सी गल पक्ष्यांची तेथील अन्नसाखळी तुटते. उपजीविकेच्यादृष्टीने कमी थंडी असलेल्या भागाकडे ते स्थलांतर करतात. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत ते कोकणात येतात.
तावरणातील बदलामुळे या कालावधीत थोडाफार बदल होतो; मात्र त्यामुळे पर्यटकांना या थव्याने राहणाऱ्या पक्ष्याचे दर्शन घेण्याची नामी संधी किनाऱ्यांवर उपलब्ध झाली आहे.
हे पण वाचा - राजापूर ग्रामीण रूग्णालयात लसीकरण केंद्राला शुभारंभ; यांना लसीकरणापासून येणार वगळण्यात
...हुशार पक्षी
सी गल हे अत्यंत हुशार शिकारी आहेत. मासा, गांडूळ, कीटक हे त्याचे मुख्य अन्न आहे. त्यांना आकर्षित करण्याचे अनेक प्रकार सी गलला ज्ञात आहेत. माशांना आकर्षित करण्यासाठी ते ब्रेड क्रमचा वापर करतात. गांडूळ जमिनीतून बाहेर यावे म्हणून पायाने पावसाचे आवाज काढतात.
उपजीविकेच्यादृष्टीने उत्तर खंडातून सुमारे 4 हजार किमी प्रवास करून हे पक्षी कोकणात येतात.
कोकणात कमी थंडी असते आणि किनारेही प्रदूषित नाहीत, स्वच्छ आहेत. किनाऱ्यावर त्यांना उपजीविकेची मुबलक साधने मिळतात.
- सुधीर रिसबुड,पक्षी निरीक्षक, रत्नागिरी
संपादन - धनाजी सुर्वे