दापोलीत दोन दिवसांआड पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

दाभोळ - उन्हाचा वाढता कडाका, पाण्याचा वाढलेला वापर आणि मोठ्या प्रमाणातील गळतीमुळे दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे ५ एप्रिलपासून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय दापोली नगरपंचायतीने घेतला आहे.

दाभोळ - उन्हाचा वाढता कडाका, पाण्याचा वाढलेला वापर आणि मोठ्या प्रमाणातील गळतीमुळे दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे ५ एप्रिलपासून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय दापोली नगरपंचायतीने घेतला आहे.

गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊन नारगोली धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे धरण ओव्हर फ्लो झाले होते; मात्र फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर तालुक्‍यात उन्हाचा कडाका वाढल्याने पाणीसाठ्यात घट होऊ लागली. नारगोली धरणाच्या इतिहासात पाणीसाठ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरवासीयांना मे महिन्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागणार असल्याचे संकेत आहेत. दापोली ग्रामपंचायत अस्तित्वात असताना १९७८ साली नारगोली धरण बांधकामाला सुरवात होऊन ते साधारणपणे १९८५ ला पूर्ण करण्यात आले. त्या वेळी दापोली शहर नगण्य लोकवस्तीचे होते. कोकण कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर शहराची लोकसंख्या वाढत गेली.

जेव्हा धरणाची कल्पना पुढे आली तेव्हा पुढील २५ वर्षांची लोकसंख्या अंदाजित धरून धरणाचे बांधकाम केले गेले; मात्र नजीकच्या काळात दापोली शहराची झपाट्याने वाढलेली लोकसंख्या पाहता धरणातील पाणीसाठा अपुरा पडू लागला. ०.५ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या नारगोली धरणात ५० फूट खोल जॅकवेल खोदलेली असून या जॅकवेलमधील पाण्याचा उपयोग आजवर शहराला होत आहे. वाढलेली लोकसंख्या आणि धरणातील पाण्याच्या खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे शहरावर पाण्याच्या दुर्भीक्ष्याचे संकट कोसळणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: after two days water in dapoli