चिवेलीवासीयांचे रस्त्यासाठी चटके सोसत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

चिपळूण - तालुक्‍यात पर्यटन विकासात आघाडी घेत असलेल्या चिवेली मार्गावरील रस्त्याची अवस्था दयनीय आहे. कौंढरताम्हाणे ते चिवेली बंदर मार्गावर बांधकाम विभागाने 20 वर्षे लक्ष दिलेले नाही. चिवेली परिसरात पर्यटनासाठी आलेला पर्यटक खराब रस्त्यामुळे दुसऱ्यांदा येण्यास राजी होत नाही. त्यामुळे चिवेली मार्गाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज चिवेली ग्रामस्थ व महिलांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले.

कौंढरताम्हाणे ते चिवेली बंद रस्त्याची दुरवस्था आहे. रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता कळत नाही. बांधकाम विभागास वारंवार निवेदने, ग्रामपंचायतींचे ठराव देण्यात आले. मात्र आश्वासनापलीकडे ग्रामस्थांच्या पदरात काहीच पडले नाही. चिवेली येथील ऐतिहासिक बंदर, निसर्गरम्य दाभोळखाडी, परिसरातील कृषी पर्यटन, आदींमुळे पर्यटक चिवेली परिसरात मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. मात्र चिवेलीत जाण्यापूर्वीच पर्यटकांचे खराब रस्त्याने स्वागत होते. पर्यटनाबरोबर गावातील आजारी व्यक्ती व शालेय विद्यार्थ्यांना खराब रस्त्याचा फटका बसत असल्याचे माजी उपसभापती व विद्यमान पंचायत समिती नंदकिशोर शिर्के यांनी सांगितले. रस्ता दुरुस्तीकडे बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ लोकसहभागातून रस्ता दुरुस्त करतात. चिवेली शाळेने देखील रस्ता दुरुस्तीसाठी 50 हजाराची मदत केली. दरड कोसळून रस्ता बंद झाल्यास तो पूर्ववत होण्यासाठी लोकसहभागातून काम होते. ग्रामस्थांचे सहकार्य असतानाही शासन रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करते. म्हणून उपोषण केल्याचे सरपंच श्रीमती प्रमिलाकाकी शिर्के यांनी सांगितले. कडक उन्हाच्या झळा बसत असनाताही महिला व ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले होते. यामध्ये सभापती सौ. पूजा निकम, सरपंच श्रीमती शिर्के, पंचायत समिती सदस्य नंदकिशोर शिर्के, उद्योजक दिनेश शिर्के, युवा नेते योगेश शिर्के, यांचा समावेश होता.

राष्ट्रवादीसह भाजपचा उपोषणा पाठिंबा
उपोषणास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पूनम चव्हाण, सौ. निकिता सुर्वे, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, रिया कांबळे, समीक्षा घडशी, संचिता केंबळे, दशरथ दाभोळकर, सईद खलपे, तसेच नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, आशीष खातू, विजय चितळे, शरद शिगवण यांनी पाठिंबा दिला.

Web Title: Againtation of chiveli's villagers