डिझेल दरवाढीविरोधात हर्णै बंदरात मच्छीमारांचा एल्गार

डिझेल दरवाढीविरोधात हर्णै बंदरात मच्छीमारांचा एल्गार

हर्णै - हर्णै बंदरातील मच्छीमारांनी डिझेल दरवाढीविरोधात भारत बंदच्या आंदोलनात सहभागी होऊन फलकाद्वारे निषेध नोंदवला. सर्व मासेमारी उद्योगच एक दिवसासाठी बंद करून सर्व नौका हर्णै बंदरात आणून उभ्या केल्या आहेत.

शासनाच्या नियमाप्रमाणे 1 ऑगस्टपासून हर्णै बंदरामध्ये सुरू झालेल्या मासेमारीला किमान महिनाभर खराब वातावरणाचे ग्रहण लागले होते. येणार्‍या धोकादायक वादळी वार्‍याच्या दिसत असलेल्या संकेतांमुळे येथील मच्छीमारांची चांगलीच फरफट उडाली होती. कधी जयगड खाडीतून आंजर्ले खाडीत, तर कधी आंजर्ले खाडीतून दिघी खाडीत, पुन्हा दिघी खाडीतून दाभोळ खाडीत अशी निव्वळ मासेमारीविना धावपळच उडाली होती. यामध्ये प्रत्येक मच्छीमाराने किमान चार ते पाच दिवसांच्या मासेमारीकरिता 1 ते 1.5 लाख रुपयांचे डिझेल बोटींमध्ये भरले होते. या धावपळीत भरलेले डिझेल वाया गेले.

गेल्या महिन्यात प्रत्येक नौकामालकाला 1 ते 1.5 लाखाचा तोटा झाला. त्यानंतर साधारण 25 ते 26 दिवसांनी या मच्छीमारांना वाम, सुरमई, पापलेट, म्हाकुळ, कोळंबी, बग्गा आदी प्रकारची मासळी बंपर मिळू लागली होती, परंतु तेव्हा दराने तोंड फोडले. मोठ्या मासळीच्या मिळणार्‍या वाजवी दरात मोठी तफावत होत होती. कारण माल सगळ्याच बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात मिळत होता. त्यामुळे या बंदरातील मच्छीमारांचा डिझेलचा खर्च सुटणे मुश्किल झाले.

डिझेलसह इतर सर्व खर्च मच्छीमारांच्या अंगावरच पडला. त्यातच सरकारने डिझेलचे दर वाढवले. एवढा पैसा कसा उभा करायचा असा प्रश्न मच्छीमारांना पडला आहे. डिझेल दर कमी करण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. त्यामध्ये येथील मच्छीमार सहभागी झाले. सर्व मच्छीमारांनी नौका बंदरात आणून उभ्या केल्या. डिझेल दर कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा मच्छीमारांनी बंदरावर दिल्या. त्यानंतर सर्व नौका आंजर्ले खाडीमध्ये जाऊन थांबल्या आहेत. बंदरात निषेधाचे फलक लावण्यात आले आहेत.

डिझेल दरवाढीविरोधात एक दिवस मासेमारी बंद ठेवून तीव्र निषेध नोंदवला आहे. एकीकडे मासळीचे दर घटत आहेत आणि डिझेलचे दर मात्र वाढत आहेत. याचा विचार सरकारने करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी आम्हा मच्छीमारांची मागणी आहे.

- सोमनाथ पावसे, सदस्य, मच्छीमार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com