मालवणात स्वाभिमानची महावितरणवर धडक

मालवणात स्वाभिमानची महावितरणवर धडक

मालवण - वायरी भुतनाथ शिवाजी पुतळ्यानजीकच्या विद्युत रोहित्रातून कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या तत्काळ दूर करू असे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले.

येत्या चार दिवसात ही समस्या दूर न झाल्यास खळखट्याक आंदोलन छेडले जाईल. यानंतर उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला महावितरण जबाबदार राहील असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला.

वायरी भुतनाथ शिवाजी पुतळ्यानजीक असणाऱ्या विद्युत रोहित्रावरून गेले चार-पाच दिवस कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. परिणामी ग्रामस्थांचे शेतीपंप, घरगुती वापराचे पंखे चालेनासे झाले आहेत. वायरी येथे बहुतांशी व्यावसायिकांनी पर्यटनासाठी निवास न्याहारी व्यवसाय सुरू केला आहे; मात्र सध्या कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने व्यावसायिकांनी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाढता उष्मा आणि कमी दाबाचा वीजपुरवठा यामुळे पर्यटकांचेही हाल होत असून त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. याचा फटका पर्यटन व्यवसायास बसत आहे. शिवाय शेतीपंपही चालत नसल्याने बागायतीचेंही नुकसान होत आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात यावे. याठिकाणच्या अनेक विद्युत तारा या जुन्या झाल्याने त्या कधीही कोसळून अपघात घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या जीर्ण वाहिन्या बदलण्याची कार्यवाहीही तत्काळ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. गावातील वीजपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात ही समस्या दूर न केल्यास वीज बिले भरली जाणार नाहीत. शिवाय तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. 
यावेळी देवानंद लोकेगावकर, श्‍याम झाड, अभय पाटकर, केदार झाड, राजन चव्हाण, महेश लोकेगावकर, परशुराम मयेकर, आनंद हडकर, काशिनाथ मांजरेकर, नंदू झाड, मुन्ना झाड, यतीन मालवणकर, कृष्णा देऊलकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com