रासायनिक उद्योगांची परवानगी रद्द करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

चिपळूण - लोटे येथील विस्तारित औद्योगिक क्षेत्रात रासायनिक उद्योग न आणण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते, तरीही ६ रासायनिक उद्योगांना मान्यता दिली. या रासायनिक उद्योगांविरोधात खेड तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्तांनी खेर्डी एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा गगनभेदी घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. 

चिपळूण - लोटे येथील विस्तारित औद्योगिक क्षेत्रात रासायनिक उद्योग न आणण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते, तरीही ६ रासायनिक उद्योगांना मान्यता दिली. या रासायनिक उद्योगांविरोधात खेड तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्तांनी खेर्डी एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा गगनभेदी घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. 

खेड तालुक्‍यातील असगणी, लवेल, दाभीळ परिसरातील ग्रामस्थानी काढलेल्या मोर्चात महिलाही बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांनी निषेधाचे फलक हाती घेतले होते. रासायनिक उद्योग रद्द करा, प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या, आदी घोषणा दिल्या. लोटेच्या विस्तारित क्षेत्रासाठी २९ वर्षापासून भूसंपादन सुरू आहे. मागील २ वर्षापासून स्थानिकांनी भूसंपादनास पाठिंबा दिला. एचपीसीएल कंपनीने माघार घेतल्याने प्रकल्पग्रस्तांनी सहकार्याची भूमिका घेतली.

या परिसरात कोकाकोला व भारतीय रेल्वेच्या कारखान्यांचे स्वागत केले. लोटे विस्तारित औद्योगिक क्षेत्रात रासायनिक उद्योग न आणण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. एकूण १९ उद्योगांना मान्यता दिली. त्यातील ६ रासायनिक उद्योगांची मान्यता रद्द करावी, विस्तारित क्षेत्रात एकही प्रदूषणकारी उद्योग नको, भूसंपादनातील मागण्यांचा त्वरित निपटारा करण्याची मागणी केली.

कार्यकारी अभियंता परशुराम करावडे व प्रादेशिक अधिकारी शंकर बर्गे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष हुसेन ठाकूर, अनंत नायनाक, गंगाराम इप्ते यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

विस्तारित क्षेत्रात येणारे उद्योग
कोकण रेल्वे, कोकाकोला, श्री पुष्कर केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स, सह्याद्री इन्स, शिर्के पॉलिमर्स, कृष्णा साडेकर, एसबी फार्मा, प्रसाद पटवर्धन, झेन केमिकल्स, अजिंक्‍य धावले, अभिनव इंडस्ट्री, योजना इंटरमीडीएट्‌स, सेंटप्रो इंजिनिअरिंग, सुरक्षा पॅकर्स, मैत्रेय फुड्‌स, सौजन्य कलर्स. 

लोटे औद्योगिक वसाहत क्षेत्रात सहा रासायनिक उद्योगांना मान्यता देऊन एमआयडीसीने जनतेचा विश्‍वासघात केला. या कारखान्यांची परवानगी रद्द करावी. नव्या एकाही रासायनिक उद्योगाला परवानगी देऊ नये. 
- हुसैन ठाकरू,
दक्षता समिती कार्याध्यक्ष 

Web Title: agitation in Kerdi MIDC Office