शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी रत्नागिरीत मोर्चा

राजेश कळंबटे
शुक्रवार, 8 मार्च 2019

एक नजर

  • स्थानिक शिक्षकांना नोकर भरतीत प्राधान्य देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मोर्चा
  • काही जिल्ह्यांमध्ये बिंदुनामावलीचा घोटाळा
  • रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक जागांसाठी भरती
  • 2010 च्या भरतीमध्ये 1157 जागांमध्ये फक्त 37 स्थानिक उमेदवारांना नोकरी 

रत्नागिरी - विदर्भ, मराठवाड्यात शिक्षणातील बिंदुनामावली, पटपडताळणीचे घोटाळे झाले आणि त्याची पापे कोकणवासियांच्या माथी मारली जाताहेत, हे उद्योग आता थांबवा. कोकणात नोकरीला यायचे आणि बदली करून निघून जायचे हे आता बस्स झाले. जिल्हा बदलीने विद्यार्थ्यांचे नुकसान होते आणि इथला तरूण देशोधडीला लागलाय. आता तरी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, अशी मागणी करत डीएड्, बीएड् धारकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

कोकण डीएड्, बीएड् धारक असोसिएशनने या मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड्, बीएड् धारक सहभागी झाले होते. नोकरी आमच्या हक्काची, स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही अशा घोषणा देत जिल्हा परिषद परिसर, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांना देण्यात आले. शासनापर्यंत या मागण्या पोहोचवू असे आश्‍वासन त्यांनी मोर्चेकर्‍यांना दिले. निवेदन देताना अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर, सचिव संदेश रावणंग, प्रभाकर धोपट, सचिन पावसकर, देवधर भाताडे, राखी मुंज, सारिका जमदाडे उपस्थित होते.

राज्यभरात झालेल्या विविध घोटाळ्यांमुळे 9 वर्षे शिक्षक भरती रखडली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 24 हजार पदांची घोषणा करून केवळ 10 हजारांची भरती करण्यात येत आहे. त्यातच 16 जिल्ह्यांमध्ये 50 टक्के पदभरती होणार असून 9 जिल्ह्यांत 0 जागा आहेत. काही जिल्ह्यांमध्ये बिंदुनामावलीचा घोटाळा झाला आहे. इतर जिल्ह्यांचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक जागा भरल्या जाणार असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात परजिल्ह्यातील उमेदवारांचा लोंढा पुन्हा येणार आहे. रिक्त जागांच्या तुलनेत स्थानिकांचे प्रमाण कमी असून त्यांना भरतीत प्राधान्य मिळावे, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

2010 साली आमच्यावर अन्याय झाला. त्यावेळी 1157 जागांमध्ये फक्त 37 स्थानिक उमेदवार नोकरीला लागले. प्रत्येकवेळी जास्त जागा रत्नागिरीत निघतात आणि त्यावर परजिल्ह्यातील उमेदवारांची वर्णी लागते. हेच उमेदवार जिल्हा बदली करून आपापल्या जिल्ह्यात निघून जातात. परत रत्नागिरीतील शाळा शिक्षकांविना ओस पडतात. पुन्हा जिल्ह्यातील जागा रिक्त राहतात. ही प्रक्रिया 2010 पासून सुरू असून यात स्थानिक उमेदवार आपोआपच प्रक्रियेबाहेर फेकला जात आहे. जिल्हास्तरावर होणारी भरती 2010 नंतर राज्यस्तरावरून होऊ लागल्याने याचा सर्वात मोठा फटका कोकणातील तरुणांना बसतोय. तेच धोरण आता पुन्हा राबवले जात असल्याने इथला स्थानिक देशोधडीला लागणार आहे. विदर्भ मराठवाड्यातील डीएड्, बीएड् धारकांचे पुनर्वसन पुन्हा कोकणात करून स्थानिकांना उद्ध्वस्त करू नका. शिक्षक भरतीसह विविध क, ड गटातील पदांच्या भरतींमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महिलादिनीच रणरागिणी रस्त्यावर...

तब्बल 9 वर्षे भरतीसाठी वाट पहायला लावल्यानंतर आता 10 हजारांच्या पदांचे गाजर दाखवले जात आहे. एवढे होऊनही स्थानिकांवर अन्यायच. भरती न झाल्याने आमचे करिअर बरबाद झाले, तरुणींची लग्न रखडली आहेत अशा एक ना अनेक समस्यांना तरुणी, महिलांना तोंड द्यावे लागतेय. अजून किती अन्याय सहन करायचा? असा सवाल करत महिलादिनीच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागतेय, याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. परजिल्ह्यातील उमेदवारांना येथे रूजू होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी तरुणींनी दिला. तरुणींची संख्या या मोर्चात लक्षवेधी ठरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation in Ratnagiri for first preference to Local teachers in the recruitment