पाली नगरपंचायत होण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

अमित गवळे
गुरुवार, 3 मे 2018

पाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी पालीकर जनतेला नगरपंचायतीची ओढ लागली आहे. परंतु निवडणूक आयोगाने पाली ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

पाली : समृध्दी व विकासासाठी पालीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त व्हावा या मागणीकरीता गुरुवारी (ता.३) सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व पालीकर नागरिकांनी पाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पाली नगरपंचायत व्हावी यादृष्टीने प्रशासनस्तरावर प्रयत्न व्हावेत, या मागणीचे निवेदन पालीकर जनतेच्या वतीने पाली सुधागड तहसीलदार बी.एन. निंबाळकर यांना देण्यात आले.

पाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी पालीकर जनतेला नगरपंचायतीची ओढ लागली आहे. परंतु निवडणूक आयोगाने पाली ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पालीकरांनी मात्र पाली नगरपंचायतीची प्रक्रिया होऊन पालीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा. यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहेत. पालीकरांच्या मनात असलेली नगरपंचायती विषयीची भावना प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते व पालीकर नागरिक एकत्र अाले आहेत. त्यांनी अागामी ग्रामपंचायत निवडणुकीवर टाकला बहिष्कार टाकणार असल्याचा इशारादेखील दिला आहे.

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा, भा.ज.पा सुधागड तालुकाध्यक्ष राजेश मपारा, कॉग्रेस पक्षाचे सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, पाली सरपंच जनार्दन जोशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी सुधागड तालुकाध्यक्ष संजय घोसाळकर, रि.पा.इं अध्यक्ष राहूल सोनावळे,ग.रा.म्हात्रे, प्रकाश कारखानिस, गणपतराव सितापराव,आलाप मेहता, अरिफ मनियार. अभिजीत चांदोरकर, राजेंद्र गांधी, अनुपम कुलकर्णी, आरती भातखंडे, वैशाली मपारा,पराग मेहता, सुधिर साखरले, हेमंत सिलीमकर, संजोग शेठ,निखिल खैरे, आदिंसह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व पालीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या मोर्चात शिवसेना पक्षाचा सहभाग दिसून आला नाही. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पाली पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बनवाबनवीचे धंदे

विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकांना बनवाबनवीचे धंदे शेकाप व भाजप करत आहे. अाता ग्रामपंचायत अाली असतांना लोकांना नगरपंचायत करुया असे इतर राजकीय पक्ष सांगत आहेत. या सर्व खटाटोपात ग्रामपंचायतीवर प्रशासक बसल्यास लोकांची कामे होणार नाहीत. सहा महिने व वर्षभरात नगरपंचायती संदर्भात शासनाने कोणताच निर्णय घेतला नाही तर पुन्हा जैसे थे परिस्थिती होईल. 

या अाधी होऊ घातलेली नगरपंचायत शेकापनेच घालविली अाहे. शेकाप व इतर राजकीय पक्ष नगरपंचायत होण्याचे शब्द देऊ शकतील का? या पक्षांना नैतिक अधिकारच नाही नगर पंचायत मागण्याचा. त्यामुळे योग्य जनमत घेऊन मगच काय तो निर्णय घ्यावा.

प्रकाश देसाई, जिल्हाप्रमुख, शिवसेना रायगड

 

ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार का?

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की राज्यपाल महोदय यांच्या अध्यादेशाद्वारे तालुका मुख्यालयाला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासंबंधी आदेश पारित असून, मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील अंतरिम निर्णयाद्वारे सबंधित प्रशासनाकडून वर्तमानपत्रात प्रसिध्दी न दिल्या. कारणाने सदरच्या नगरपंचायतीची प्रक्रिया थांबली होती. परंतु सद्यपरिस्थित राज्यपालांचा अध्यादेश पाली गावासाठी रद्द झाला नसून नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम लागणे हे प्रशासनाकडून अभिप्रेत होते. 

पालीतील जनभावनांचा कोणत्याही प्रकारे आदर न करता पुनश्च ग्रामपंचायत निवडणुक लावणे म्हणजेच पालीकर जनतेची प्रशासनाकडून झालेली क्रूर चेष्टा आहे. त्यामुळे सर्व पालीकर या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घोषित करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Agitation for Tehsil office for Pali Nagar Panchayat