कृषी विद्यापीठातील ठेकेदार पद्धत बंद करणार - संजय कदम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

दापोली - येथील कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची ठेकेदार पद्धत बंद करून समान काम समान वेतन या न्यायाने वेतनवाढ, पांढऱ्या व लाल मस्टर अन्यायी पद्धत असे विविध विषय पुढील कार्यकारी परिषदेच्या बैठकीत ठराव मांडून सोडवण्याची ग्वाही आमदार संजय कदम यांनी कृषी विद्यापीठातील अस्थायी स्वरूपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली.

दापोली - येथील कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची ठेकेदार पद्धत बंद करून समान काम समान वेतन या न्यायाने वेतनवाढ, पांढऱ्या व लाल मस्टर अन्यायी पद्धत असे विविध विषय पुढील कार्यकारी परिषदेच्या बैठकीत ठराव मांडून सोडवण्याची ग्वाही आमदार संजय कदम यांनी कृषी विद्यापीठातील अस्थायी स्वरूपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली.

गेली कित्येक वर्षे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील तात्पुरत्या स्वरूपात कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य संजय कदम यांनी आयोजित केली होती. बैठकीला कृषी विद्यापीठातील कुलसचिव कार्यालयाचे सहायक नियंत्रक अनिल पवार, हेमंत कामत यांनाही बैठकीला बोलावून कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्‍यक मदत करा, असे आदेश श्री. कदम यांनी दिले. केवळ १८० रुपयांवर मजुरी करणाऱ्या कामगारांना किमान वेतन ३०० रुपये करावे, यासाठी आपण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

साडेतीन हजार कर्मचाऱ्यांच्या तब्बल १०३ पानांच्या यादीत मृत कर्मचारी, अर्धा दिवस काम केलेले कर्मचारी, काम सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांची नावे यादीतून कमी करून जे कामगार म्हणून कार्यरत आहेत, त्यांना सरळ सेवेने सामावून घेणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना कृषी विद्यापीठाने न्याय न दिल्यास कर्मचाऱ्यांनी प्रसंगी या विरोधात कामगार न्यायालयात जावे, यासाठी लागणारा खर्च आपण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. विद्यापीठ प्रक्षेत्रावर काम करताना हॅंडग्लोव्‍हज, हात धुण्यासाठी साबण आणि प्रथमोपचार सुविधाही दिल्या जात नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकून आमदार संजयराव कदम यांनी सगळ्या सुविधा तुम्हाला मिळायलाच हव्यात, यासाठी आपण कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विषय मांडून मंजूर करून घेऊ, असे आश्वासन दिले. चौथी पास कर्मचाऱ्यांसाठी इंग्रजीमध्ये पेपर काढून ग्रॅज्युएट उमेदवारांची भरती केली जात असून, स्थानिकांवरच कायमच अन्याय होत आहे. यापुढे हे सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. याप्रसंगी आमदार संजय कदम यांचा शाल व श्रीफळ देऊन कर्मचाऱ्यांनी गौरव केला. यावेळी रवींद्र कालेकर, मोहन मुळये, युवक तालुकाध्यक्ष विजय मुंगशे, कृषी विद्यापीठातील कर्मचारी उपस्थित होते.

कायम करण्यासाठी पैसे घेतले - कदम
शासनाने पांढऱ्या मस्टरवरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला; मात्र काहींनी हे काम आपणच केल्याच्या भूलथापा मारून दापोली तालुक्‍याबाहेरील एका माजी आमदारांमार्फत काहींनी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप आमदार संजय कदम यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या अज्ञानाचा कोण फायदा घेणार असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला.
 

आम्हाला विद्यापीठ प्रक्षेत्रावर काम करताना हॅंडग्लोव्‍हज्‌, हात धुण्यासाठी साबण आणि प्रथमोपचार सुविधाही दिल्या जात नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 
- दिनेश कडू, कर्मचारी

Web Title: agriculture university contractor process will close