सिंधुदुर्गात ॲग्रो टुरिझम सुरू करणार - पर्यटनमंत्री रावल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

वेंगुर्ले - ‘‘कोकण कृषी विद्यापीठाची मदत घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पाइस व्हिलेज व ॲग्रो टुरिझम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात स्थानिकांना प्राधान्याने संधी देण्यात येईल,’’ अशी ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

वेंगुर्ले - ‘‘कोकण कृषी विद्यापीठाची मदत घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पाइस व्हिलेज व ॲग्रो टुरिझम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात स्थानिकांना प्राधान्याने संधी देण्यात येईल,’’ अशी ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

केंद्र सरकारने स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ८३ कोटी मंजूर केले आहेत. ते येत्या १६ महिन्यांत खर्ची घालण्यात येणार आहेत, असेही रावल यांनी सांगितले. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, संदेश पारकर उपस्थित होते. शहरात रावल यांचे आगमन होताच त्यांचे सागर बंगल्यावर पंचायत समिती सभापती यशवंत परब, उपसभापती स्मिता दामले, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, चिटणीस साईप्रसाद नाईक, संदीप पाटील, वृंदा गवंडळकर, सुषमा प्रभू खानोलकर, बाळू प्रभू यांनी स्वागत केले.

श्री. रावल म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील समुद्रकिनारे हे पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत. या ठिकाणी पर्यटकांनी पोचून निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेणे गरजेचे आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत, पालिका यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पर्यटक किनाऱ्यापर्यंत पोचण्यासाठी प्रशासनामार्फत रस्ते, स्वच्छतागृह, पार्किंग व्यवस्था, न्याहारी निवास, स्कुबा डायविंग, वॉटर स्पोर्टस्‌ इत्यादी सुविधा पर्यटन मंत्रालयातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.’’

कोंकण कृषी विद्यापीठाची मदत घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पाइस व्हिलेज व ॲग्रो टूरिझम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नावबाग येथे फिशरी व्हिलेजसाठी ९ कोटी मंजूर झाले आहेत. त्या ठिकाणी पर्यटनस्थळांची माहिती देणारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याचा फायदा पर्यटकांबरोबरच स्थानिक युवकांना होणार.’’ या वेळी रावल यांनी ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.
 

वेंगुर्ले व शिरोडा येथे स्कुबा डायव्‍हिंग प्रशिक्षण केंद्र, बीच सेफ्टीसाठी रेडिओ, माइक सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी येथील स्थानिक तरुणांना प्राधान्य देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टुरिझमच्या वेगवेगळ्या संघटना स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच कृषी पर्यटनासाठी बिनशेती अट रद्द करणे व विद्युत पुरवठा घरगुती दराने देण्याचा विचार शासनाचा आहे.
- जयकुमार रावल, पर्यटनमंत्री

Web Title: agro tourism will start in sindhudurg