नाम, नमक, निशाण यावरच सैनिकांची निष्ठा

नाम, नमक, निशाण यावरच सैनिकांची निष्ठा

सैनिकांची निष्ठा अत्यंत तीव्र असते. त्यावर समाजातील गोष्टींचा परिणाम होत नाही, होताही कामा नये. सैनिकांसाठी नाम, नमक आणि निशाण हे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यांच्याशी तो निष्ठेने बांधलेला असतो. तो ज्या बटालियनमध्ये काम करतो त्याचे नाव राष्ट्रध्वज आणि ज्या देशाचे मीठ खातो, तो देश हेच त्याचे सर्वस्व असते. देशांतर्गत घडामोडीचा विचार करून तो विषण्ण होत नाही. त्याचे नीतिधैर्य खालावत नाही. असे होत असेल, तर तो सैनिक प्रोफेशनल सैनिक नव्हे, असे प्रतिपादन एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांनी येथे केले. 

‘सकाळ’च्या चिपळूण कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त भागवत यांच्याशी गुरुवारी (ता.३१) लोटिस्माच्या उषाताई साठे सभागृहात मुक्त संवाद आयोजित केला होता.

या वेळी देशातील बजबजपुरी आणि निराशाजनक परिस्थितीचा परिणाम होऊन मी लढायचे कुणासाठी, असा प्रश्‍न पडून सैनिकांच्या नीतिधैर्यावर परिणाम होतो का आणि ते उंचावण्यासाठी काय करता, या  प्रश्‍नावर भागवत यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना भारताचा मानबिंदू होता. त्याच वेळेस ब्रिटिश आर्मीसाठी वीस लाख भारतीय सैनिक लढत होते. त्यापैकी किती जण आझाद हिंद सेनेत गेले, अगदी किरकोळ. सैनिकाची निष्ठा अशी असते. कोणासाठी लढायचे, असा प्रश्‍न सैनिकाला पडत नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. 

सीमेवर लढणारे सैन्य तेच असते. तुम्ही सतत लढत असता व सज्ज असता. अशा वेळी निर्णय घेणारे व आदेश देणारे सरकार राजकीय परिस्थितीनुसार बदलते. याचा परिणाम सैन्यदलावर होतो का, या मंदार ओक यांच्या प्रश्‍नाला साऱ्यांनी दाद दिली. भागवत म्हणाले निश्‍चितच होतो. गेल्या पाच वर्ष लष्कराची निकड जाणवून भरपूर सोयीसुविधा दिल्या आहेत. सरकारचा लष्कराला पूर्ण पाठिंबा आहे. याचा सकारात्मक परिणाम लष्कराच्या मनोधैर्यावर होतो. काश्‍मीरातही लष्कराला फ्री हॅंड दिला आहे. याचा अर्थ लष्करावर मर्यादा आहेतच. जे नागरी नियम आहेत ते पाळूनच कारवाई करायची असते.

या आधी अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिराजी यांच्या काळातही भक्कम पाठिंबा मिळाला होता, असा उल्लेख त्यांनी केला. हे दोनही नेते मुत्सद्दी होते. जागतिक भान असणारे होते,असेही त्यांनी सांगितले.

वायुदलात प्रवेश घेण्याची प्रेरणा काय होती, या रेखा देशपांडे यांच्या प्रश्‍नावर भागवत म्हणाले, मी ॲक्‍सिडेंटल एअरफोर्समध्ये भरती झालेला आहे. मला भूदलात जायचे होते. तेथे जाण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही, असा समज होता. त्याकाळी माहिती मिळवण्यासाठी आतासारखी माध्यमे नव्हती, सुविधा नव्हत्या, पण रेडिओ होता. रात्री साडेअकराच्या बातम्यांमध्ये जगभरातील घडामोडीचे ज्ञान बीबीसीवर मिळायचे. ते ऐकून माझे इंग्रजीही सुधारले. 

कोकणात सैन्यात जाण्याची परंपरा आहे. त्यातूनच बीएस्सीला असताना लष्करात जाण्याचे निश्‍चित केले. लष्करी प्रवेश परीक्षेसाठी इंग्रजी व सामान्यज्ञानावर फोकस केला. संपूर्ण तयारी करून सैन्य प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. यासाठी आई-वडिलांचा पाठिंबा कायम होता.

भूदलात डॉक्‍टरने अनफिट ठरवले. त्यानंतर एक वर्ष कायद्याचा अभ्यास केला. मग मित्रांनी एअरफोर्समध्ये संधी असल्याचे सांगितले. तेव्हा अपघातानेच तिकडे गेलो. सुदैवाने तेथील पाठोपाठच्या  परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झालो. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फिट ठरवले. (या वेळी येथे डॉक्‍टर कोण आहेत माहिती नाही. एक फिट, तर दुसरा अनफिट ठरवतो हे कसे माहित नाही, अशी मिश्‍कील मल्लीनाथी त्यांनी केली.) आई-वडिलांनी सैन्यात जाण्यास हरकत घेतली नाही का, असे विचारता ते म्हणाले,

त्यांनी कधीच आमच्या निर्णयात ढवळाढवळ केली नाही. माझी आई १९६२ सालची पदवीधर होती. त्यामुळे तिचा दृष्टिकोन संकुचित नव्हता. एअरफोर्स जॉईन केल्याबद्दल त्यांना आनंदच झाला. त्यानंतर वैद्यकीय चाचणी यशस्वीपणे पार पाडली. 
प्रशिक्षण किती खडतर असते आणि तेथे टिकाव कसा लागतो या मंदार ओक यांच्या प्रश्‍नावर भागवत म्हणाले, वायुदलाचे प्रशिक्षण घेताना सुरवातीला केवळ ४८ तास त्रासदायक वाटतात. पण तेथील वेळ व कामाचे नियोजन इतके वेगवान असते की, वेगळा विचार करायला वेळच नसतो.

मुख्य म्हणजे या प्रशिक्षणात वरिष्ठ अधिकारी एकीकडे आपल्याला घडवतात व दुसरीकडे आपल्यातील गुण हेरून योग्य पद्धतीने त्या गुणांचा विकास करतात. त्यावेळी आपल्यावर लक्ष ठेवले जाते याची कल्पनाही नसते. नवीन मुलगा वागतो कसा,खातो कसा, मुलांत मिसळतो कसा, त्याची एकाग्रता किती आहे, त्याची मानसिक क्षमता किती आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने आजमावले जाते. युद्ध नसताना सातत्याने सुरू असलेल्या युद्ध प्रशिक्षणाच्या कामात पुढे प्रशिक्षक म्हणूनच माझी निवड झाली.

पहाटे ४ ते रात्री १२ पर्यंत कामाचे वेळापत्रक असते. साधारण दोन आठवड्यानंतर प्रशिक्षणार्थी रुळतात. संतुलित व वेगवान कृती करणारे व्यक्तिमत्त्व प्रशिक्षणात घडते.प्रशिक्षणार्थींच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवून त्याचा अभ्यास केला जातो. व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून पुढे बोर्ड प्रेसिडेंट मुलाखतीला सामोरे जावे लागते. सुरवातीच्या खडतर प्रशिक्षणात १० टक्के तरुण गळतात. उरलेल्यांचा कणखरपणा तपासला जातो.

मुलींनाही खडतर प्रशिक्षण दिले जाते. सुरवातीला मुलींबाबत त्या सोडून जाऊ नयेत, असा दृष्टिकोन असल्याने थोडे सहृदयतेने पाहिले जाई. मात्र प्रशिक्षणात कसूर नसे. पोहोण्यामध्ये मुलांना ७ मीटर उंचीवरून सूर, तर मुलींना ५ मीटरची मुभा होती. मात्र ज्यांना ७ मीटरवरून सूर मारायचा त्यांना परवानगी दिली. तेव्हा ८० टक्के मुलींनी ७ मीटरवरून सूर मारला, असे दामले यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

मुली कोठेच कमी पडत नाहीत, असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. लष्करात वैद्यकीय विभाग खूप भक्कम असतो. सर्वाधिक संख्येने डॉक्‍टर काम करत असतात. स्वतंत्र मेडिकल कॉलेजदेखील आहे. या ठिकाणी स्टाफदेखील भरपूर असावा लागतो. वैद्यकीय, परिचारिका यासाठी खूप कर्मचारी लागतात, अशी माहिती एका श्रोत्याच्या प्रश्‍नावर दिली.

लष्कराला वेगळी न्याय यंत्रणा असते का विचारता भागवत म्हणाले, सर्व नागरिकांना असणारी न्याय यंत्रणा सैनिकांसाठी असते. मात्र लष्कराची अशी वेगळी न्याय यंत्रणा ही लष्कराची संबंधित सैनिकाच्या तक्रारी, अन्याय याचे निवारण करण्यासाठी असते. तेथे बरेच वेळा ही न्याय यंत्रणा वापरतो. कारण तेथे विनाविलंब न्याय मिळतो. नागरी प्रश्‍न वा आरोप या बाबत नेहमीची न्याय यंत्रणा सैनिकांसाठी असते. 

पाकची घुसखोरी सिद्ध झाली
कारगिल युद्धात परकीय भूमीत घुसायचे नाही,असे वाजपेयींचे आदेश होते. मीडियाला युद्धभूमीवर परवानगी दिली. त्यामुळे पारदर्शकता आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची न्याय्य भूमिका समोर आली व पाकची घुसखोरी सिद्ध झाली. युद्ध जिंकण्यास सैन्याला या भूमिकेचे पाठबळ मिळाले.

पाक सैन्याने मृतांना तेथेच सोडून दिले
कारगिल युद्धाच्या वेळचा अनुभव सांगताना भागवत म्हणाले, अचूक युद्धनीतीने पाक सैन्यांची कोंडी केली होती. त्यांच्या मर्मस्थानावर घाला पडल्यावर त्यांचे मनोधैर्य खालावले. भारताने युद्ध जिंकले आणि पाक सैन्याने शंभरहून अधिक पाक सैनिकांचे मृतदेह तेथेच सोडून दिले. हे मृतदेह ताब्यात घ्या, असे भारतीय लष्कर सांगत होते. मात्र पाक सैन्याने त्यांना तेथेच टाकून दिले. शहीद झालेल्या प्रत्येक भारतीय जवानाचा मृतदेह तिरंग्यात लपेटून सन्मानाने त्याच्या गावात नेण्यात यावा, असे वाजपेयी सरकारचे आदेश होते.

तांत्रिक कर्मचारी अधिक लागतात
विमानदलाची रचना पाहता त्यामध्ये फ्लाइंग ब्रॅंच असते. अन्य विभागात अभियंत्याची गरज फार असते. मेकॅनिकल व इलेक्‍ट्रॉनिक्‍स अभियंते हवे असतात. दीड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर नियमित सेवा सुरू होते. काही विशेष विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असतात. शांततेच्या काळात सातत्याने ज्येष्ठ अधिकारी नव्या तरुणांना प्रशिक्षण देतात. स्पोर्टस ॲक्‍टिव्हिटी, पॅराशूट ग्लायडिंग अशा गोष्टी असल्याने ताण फारसा नसतो. युद्धकाळासाठी आवश्‍यक ती अचूक कृती प्रशिक्षणात पूर्ण होते.

प्रक्रिया साखळी पद्धतीने
एका विद्यार्थ्याने शस्त्रास्त्र खरेदीत खरेदीत सरकारी अधिकाऱ्यांना ‘से’ असतो का विचारता भागवत यांनी हसून प्रश्‍नाचे स्वागत केले. अत्यंत नेमकेपणाने उत्तर देताना ते म्हणाले,शस्त्रास्त्र खरेदी ही प्रक्रिया एक टीमवर्क असते. लष्कराच्या गरजा पाहून नवीन तंत्राची अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी कायम करावी लागते. त्यासाठी संशोधन विभाग असतो. तांत्रिक तपासण्या कराव्या लागतात. त्यावर तज्ज्ञ तपास करतात आणि निर्णय होतो. ही प्रक्रिया साखळी पद्धतीने होते. बाळ मी काय म्हटले, ते तुझ्या लक्षात आले ना? या त्यांच्या पुढील प्रश्‍नाने खसखस पिकली. 

वीस हजार फुटांवर ऑक्‍सिजन अपुरे
एका विद्यार्थिनीने पंधरा हजार फूट उंचीवरून उडी मारताना ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होत नाही का,असे विचारता त्यांनी तिला तू शास्त्राची विद्यार्थिनी आहेस का, असा प्रतिप्रश्‍न केला व म्हणाले, शास्त्रीय उत्तर देतो. पॅरा ऑपरेशन एअरबॉर्न कॅटॅगरी प्रकारात येतो. स्काय डायव्हिंगचा अनुभव अत्यंत वेगळा असतो. वीस हजार फुटांवर ऑक्‍सिजन अपुरा पडतो. त्यावेळी ऑक्‍सिजन बॉटल व मास्क वापरून शरीरात पुरेसा ऑक्‍सिजन काही सेकंदांत घ्यावा लागतो. एवढ्या उंचीवर शरीरातील वायू बाहेर येतात. हवेत दाब कमी होत जातो, तर पाण्यामध्ये उलट दाब वाढतो असेही त्यांनी सांगितले.

फर्नांडिस १९ वेळा सियाचीनमध्ये गेले
नुकतेच निधन झालेले माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दल आठवण सांगा, अशी विनंती दामले यांनी केल्यावर ते म्हणाले, की फर्नांडिस इतरांपेक्षा वेगळेच होते. ते संरक्षणमंत्री असताना सर्वाधिक म्हणजे १९ वेळा सियाचीनमध्ये भारतीय सैनिकांबरोबर राहिले. एवढेच नव्हे, तर जेवताना ते साध्या सैनिकांसोबत सैनिकांना दिले जाणारे जेवण जेवले. त्यांच्या साधेपणाने सैनिक भारावले. 

अधिकाऱ्याला आठ दिवस लडाखला पाठवा
फर्नांडिस यांचे आणखी एक वैशिष्ट्य सांगताना भागवत म्हणाले, की लडाखमधील सैनिकांना काही साधनसामग्री हवी होती. लष्करातही काही वेळा लाल टेप असते. त्या फाईलवर सही करण्यास विलंब झाला होता. फर्नांडिस यांनी ती फाईल पाहिली. तेव्हा ते संतापले. विलंब करणाऱ्या अधिकाऱ्याला आठ दिवस लडाखला राहायला पाठवा, असे फर्मान त्यांनी काढले. तो अधिकारी लडाखला जाऊन आला आणि त्याच्या वर्तणुकीत फरक पडला. फाईल पुढे सरकली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com