रत्नागिरीतील करबुडे बोगद्यात सुरक्षिततेसाठी "वायुव्हिज'

रत्नागिरीतील करबुडे बोगद्यात सुरक्षिततेसाठी "वायुव्हिज'

रत्नागिरी - सर्वाधिक लांबीच्या बोगद्यापैकी एक असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील करबुडेच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण यंत्रणा कार्यान्वित आहे. हवा खेळती ठेवण्यासाठीची वायूव्हिज यंत्रणा चोवीस तास कार्यरत असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारीही नियुक्‍त केले आहेत. त्यामुळे करबुडे टनेलमधील प्रवास सुकर आणि तितकाच सुरक्षित होतो. कोचीवल्ली गाडी 20 जूनला बंद पडली तेव्हा याचा पडताळा आला. 

कोकण रेल्वे मार्गावरील 58 बोगद्यांपैकी सर्वात मोठा बोगदा म्हणून करबुडेची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी इंजिन बिघडल्याने येथील सुरक्षिततेविषयी चर्चा झडू लागल्या. आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोरे प्रशासनाने उत्कृष्ट यंत्रणा राबवली आहे.

हा बोगदा साडेसहा किलोमीटर लांबीचा असून तो पार करण्यासाठी सहा ते सात मिनिटे लागतात. आतील सुरक्षिततेसाठी चोवीस तास तीन शिफ्टमध्ये बारा कर्मचारी आहेत. एक रेल्वे ट्रॅकमन एका शिफ्टमध्ये 14 किमी गस्त घालतो. शंभर मीटरवर कर्मचाऱ्यांना आश्रय घेण्यासाठी मॅन रिफ्यूज आणि ट्रॉली रिफ्यूज सुविधा आहे.

बोगद्यात प्रत्येक 500 मीटरवर ऑप्टिकल फायबर फोन स्टॉकिटमधून थेट स्टेशनमास्तर, बोगद्यातील वायूव्हिजची यंत्रणा पाहणाऱ्या कक्षाशी आणि बेलापुरातील मुख्य नियंत्रण कक्षाशी बोलता येते. तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या नऊ रेल्वे ट्रॅकमनना दर दोन तासांनी स्टेशनमास्तरशी संपर्क साधणे बंधनकारक आहे. एका रेल्वे ट्रॅकमनला सव्वादोन किमीचे अंतर कापून आतील सुरक्षा तपासावी लागते. एका शिफ्टला तीन रेल्वे ट्रॅकमन काम करतात. 

बोगद्यात अनुचित घटना निदर्शनास आली तर थेट इथल्या संपर्क यंत्रणेद्वारे जवळच्या स्टेशनशी संपर्क साधायचा असतो. गाडी बोगद्यात बंद पडल्यानंतर याच यंत्रणेचा वापर करून संपर्क साधला. बोगद्यात विविध प्रकारचे वायू तयार होत असतात. त्यात मिथेन कार्बनडाय आँक्‍साईड, कार्बन मोनाक्‍साईडचा समावेश आहे. त्याचा त्रास प्रवाशांना होऊ नये यासाठी वायुव्हिज यंत्रणा कार्यान्वित आहे. 

बोगद्यात काम करणे जिकिरीचे असते. रेल्वे ट्रॅकमन ते लिलया पार पाडतात. पंचवीस वर्षांत या बोगद्यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. याचे श्रेय इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आहे. 
- उपेंद्र शेंड्ये,
विभागिय व्यवस्थापक, कोकण रेल्वे 

लांब बोगद्यातील सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने करबुडे बोगद्याच्या सुरक्षेसाठी वायूव्हिजची यंत्रणा कार्यान्वित आहे. 

- पुंडलिक किनरे, सुपरवायझर करबुडे बोगदा 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com