"त्या' गाळ्यांचे पैसे कोणाच्या खिशात" ? साळगावकरांच्या आरोपाला उत्तर 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

"अनधिकृत स्टॉलबाबत साळगावकर आता बोलत आहेत; मात्र पालिकेत सतरा-झिरो सत्ताबळ असताना पालिकेत साळगावकर यांचे राज्य होते

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सत्ताकाळात इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळे कोणाकोणाला देऊन ते पैसे कोणाच्या खिशात घातले याचा खुलासा आधी करावा. त्यांनी नगराध्यक्ष परब यांच्या बदनामीचे षडयंत्र वेळीच थांबवावे. आम्ही कारनामे बाहेर काढल्यास त्यांना सावंतवाडी सोडावी लागेल, असा इशारा भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिला आहे. 

स्टॉल हटाववरून उपोषणास बसणाऱ्या एका अपंग बांधवाला साळगावकर यांनी नगराध्यक्ष केबीनमधुन "गेट आऊट' केले होते. त्यांच्या गेट आऊटचा अनुभव अनेक नागरिकांनाही आला होता. त्यामुळे नागरिकांनी त्यांना कायमचेच गेट आऊट केले; मात्र आज रवी जाधव यांना पुढे करणारे साळगावकर त्या अपंगाला न्याय का देऊ शकले नाही, असा प्रत्यारोपही  गोंधावळे यांनी केला. 
 गोंधावळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष परब यांच्यावर साळगावकर यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. यावेळी केतन आजगावकर, निशांत तोरस्कर, बंटी पुरोहित, अमित परब परिणीती वर्तक आदी उपस्थित होत्या. 

गोंधावळे म्हणाले, शहराच्या विकासाचे ध्येय घेऊन अहोरात्र काम करणाऱ्या नगराध्यक्ष परब यांच्यावर खोटेनाटे आरोप करून विकासात खोडा घालण्याचे काम करत आहेत. मुळात कोरोना काळात नगराध्यक्ष परब हे अहोरात्र नागरिकांची सेवा करीत असताना, गरजूंना धान्य पुरवठा करत असताना साळगावकर कुठे लपून बसले होते ? एकदा नव्हे तर दोन दोनवेळा डिपॉझिट जप्त झालेल्या साळगावकर यांनी आपणाला जनतेने का नाकारले याचे आधी आत्मपरीक्षण करावे. ज्यावेळी इंदिरा गांधी व्यापारी संकुल उभे राहिले त्यावेळी त्याठिकाणी असणाऱ्या स्टॉल धारकांचे पुर्नवसन करण्यात आले; मात्र साळगावकर यांनी त्यावेळी व्यापारी संकुलामध्ये कोणाकोणाला गाळे दिले ? त्यावेळी घेतलेले पैसे कोणाच्या खिशात घातले ? हे आधी जाहीर करावे. व्यापारी संकुलात अनेक दुकानगाळे नगरसेवकांचे पाहुणे व नातेवाईकांच्या नावे कसे काय गेले ? याचाही साळगावकरांनी खुलासा करावा.'' 

 गोंधावळे पुढे म्हणाले, "अनधिकृत स्टॉलबाबत साळगावकर आता बोलत आहेत; मात्र पालिकेत सतरा-झिरो सत्ताबळ असताना पालिकेत साळगावकर यांचे राज्य होते. यावेळी सत्तेचा गैरवापर कोणी केला ? व्यापारी संकुलामागे अनेक टपऱ्या कंपाउंडला लागून उभ्या राहिल्या. त्यावेळी अनेक आर्थिक आरोप साळगावकरांवर झाले. शिवउद्यानातील हॉटेल निविदा न काढतातच कोणाला दिले होते ? यासारख्या प्रश्‍नांची साळगावकरांनी स्वतःहून उत्तरे द्यावीत. आज रवी जाधव यांचे कारण पुढे करून ते राजकारण करत आहेत; मात्र गेल्या या आठ वर्षात नगराध्यक्षपद हातात असताना साळगावकर रवी जाधव यांचे पुनर्वसन का करू शकले नाहीत ?'' 

ते शहराचे काय होणार 
आमदार दीपक केसरकर यांनी ज्या साळगावकरांना दोनवेळा नगराध्यक्षपदी बसवले. आयुष्यभर राजकीय साथ दिली त्याच साळगावकरांनी आमदारकीच्या हव्यासापोटी केसरकर यांच्या पाठित खंजीर खुपसला. जे केसरकरांचे होऊ शकले नाही ते सावंतवाडी शहराचे काय होणार, असा टोलाही श्री गोंधावळे यांनी लगावला. 

संपादन- अर्चना बनगे
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajay gondavale press conference sawantwadi kolhapur