राजापूर काँग्रेसमध्ये बंडाळीचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

राजापूर - युवा नेते अजित यशवंतराव यांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गंत असंतोष खदखदत असून त्याच्यातून नाराज झालेल्या काँग्रेसमधील जुन्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसला कायमचाच रामराम ठोकण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

राजापूर - युवा नेते अजित यशवंतराव यांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गंत असंतोष खदखदत असून त्याच्यातून नाराज झालेल्या काँग्रेसमधील जुन्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसला कायमचाच रामराम ठोकण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीआधी चर्चेत असलेल्या या संभाव्य बंडाळीने काँग्रेससह राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधील या अंतर्गंत बंडाळीचा फायदा उठवत नाराजांना आपल्याकडे खेचण्यासाठी अन्य राजकीय पक्षांनी व्यूहरचना आखल्याचेही चर्चिले जात आहे. तालुक्याच्या राजकारणामध्ये नंबर दोनचा राजकीय पक्ष म्हणून ओळखल्या जात असलेल्या काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गंत वाद उफाळून आला आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकणे आणि नव्याने पक्षाला उभारी देण्याच्या उद्देशाने राजापूर विधानसभा मतदारसंघातील युवा नेते श्री. यशवंतराव यांना काँग्रेसमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

त्याबाबत काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळव्यामध्येही चर्चाही झाली होती. मात्र, त्याचवेळी काँग्रेसमधील काहींनी यशवंतराव यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या आणि तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये पक्षवाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या जुन्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला कायमचाच रामराम करण्याची मानसिकता बनल्याचे एका पदाधिकार्‍याने स्पष्ट केले. त्याच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये बंडाळीचे संकेत मिळत आहेत. मध्यंतरी, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली कटुता दूर करण्याचा जिल्हास्तरावरील काही पदाधिकार्‍यांनी केला होता. मात्र, असंतोष अद्यापही शमल्याचे चित्र नाही.  

गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षवाढीसाठी काम केले. आता पक्षामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मताला किंमत राहिली नसल्याची खंत व्यक्त करीत नाराज पदाधिकार्‍याने सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याची माहिती दिली. 

भविष्यातील निवडणुका पाहता पक्ष बांधणी आणि पक्ष वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी अजित यशवंतराव सारखे युवा आणि अभ्यासू नेतृत्वाचे पक्षामध्ये स्वागत आहे. याचा वरिष्ठांनी प्राधान्याने विचार करावा.

- जयवंत दुधवडकर, माजी तालुकाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Ajit Yashvantrao entry in congress issue