'रायगड पॅटर्न' सर्वच किल्ल्यांवर - कदम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

अलिबाग - जिल्हा प्रशासनाने स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन रायगड किल्ल्यावर प्लॅस्टिकमुक्ती केली आहे. हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवून राज्यातील सर्व गड-किल्ले प्लॅस्टिकमुक्त केले जातील, अशी घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी येथे गुरुवारी (ता. 18) केली. "संपूर्ण राज्यात अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याइतका स्वच्छ किनारा मी पाहिला नाही. या स्वच्छतेबद्दल मी अलिबागकरांचे कौतुक करतो', असे कौतुकोद्‌गारही कदम यांनी काढले. राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी प्रस्तावित आहे. त्याअनुषंगाने स्वच्छताविषयक कोकण विभागीय बैठक कदम यांच्या अध्यक्षतेखाली येथील हॉटेल मॅपल आयव्हीवायच्या सभागृहात झाली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, प्रभारी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Web Title: alibag konkan news raigad pattern on all forts