नायब तहसीलदाराला लाच घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

अलिबाग - उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणारे अलिबागचे नायब तहसीलदार सुभाष माने (वय 56) यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली आहे. माने हे पुढच्या वर्षी निवृत्त होणार होते.

तक्रारदाराला वैयक्तिक कामासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्‍यकता होती. त्यासाठी त्यांनी अलिबाग तहसीलदार कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. ही जबाबदारी नायब तहसीलदार सुभाष माने यांच्याकडे होती. तक्रारदाराने त्यांच्याशी संपर्क केला असता दाखल्यावर सही करण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले.

त्यानंतर अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात माने यांच्याविरोधात 3 ऑक्‍टोबरला तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची 4 ऑक्‍टोबरला पडताळणी केल्यानंतर तहसील कार्यालयात आज सापळा रचून लाच घेताना माने यांना पकडण्यात आले. माने यांनी चार महिन्यांपूर्वीच नायब तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी ते निवडणूक विभागात कार्यरत होते. पुढच्या वर्षी ते निवृत्त होणार होते.

Web Title: alibag konkan news tahsildar arrested in bribe case