एटीएमच्या पावतीवरून लागला खुनाचा छडा 

एटीएमच्या पावतीवरून लागला खुनाचा छडा 

अलिबाग - पुण्यातील धनकवाडी येथील नरेंद्र प्रवीण कुलकर्णी याची निर्घृण हत्या करून पुरावे नष्ट करणाऱ्या सहा आरोपींना एटीएम पावतीच्या साह्याने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या पूर्वनियोजित खुनामागे नेमके कोणते कारण आहे, हे अजून गुलदस्तात आहे; मात्र पैशासाठी अथवा अनैतिक संबंधातून प्रवीणचा खून झाल्याचा संशय पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

पारस्कर म्हणाले, ""या प्रकरणातील मुख्य आरोपी हेमंत विचारे (वय 29, रा. मोहननगर, पुणे) याने अन्य पाच जणांच्या मदतीने प्रवीणचा खून केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी विचारेसह दत्ता लोखंडे व रोहित गायकवाड या मुख्य आरोपींना खालापूर न्यायालयाने 23 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य तीन आरोपींनाही कोठडी मिळण्यासाठी सोमवारी (ता. 19) न्यायालयात हजर करण्यात आले होते.'' 

मुख्य आरोपी हेमंत याने 23 डिसेंबर 2016 रोजी नरेंद्र यास ठार मारण्याचा कट रचला. यामध्ये हेमंत याच्यासोबत दत्ता लाला लोखंडे (पुणे), विशाल विवेक कोरडे (ताकई, बौद्धदवाडा, खालापूर), रोहित गायकवाड, विशाल कसबे (पुणे), सचिन भोसले (खोपोली) या आरोपींनी नरेंद्रची मोटारसायकल त्याच्या घरी पार्क केली. तसेच त्याच्याच मोबाईलवरून वर्षभरासाठी लुधियानाला जात असल्याचा मेसेज त्याच्या घरी पाठविला. त्यानंतर नरेंद्रचे दोन्ही मोबाईल बंद करून त्याला जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने खोपोली परिसरातील अलाना कंपनीच्या पाठीमागील ओसाड जागेत घेऊन गेले. तेथे नरेंद्र याच्यावर मोठ्या दगड आणि विटांनी मारा करून त्याचा खून केला. पोलिसांच्या हाती कोणतेही पुरावे लागू नये, म्हणून त्याच्याजवळील सामान काढून रेल्वे मार्गावर फेकून दिले; मात्र कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी केवळ एटीएम पावतीच्या आधारे नरेंद्र याच्या घरच्यांचा शोध घेतला. यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजयकुमार पाटील, खालापूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक व्ही. टी. पांढरपट्टे आदींच्या पथकाला मुख्य आरोपीसह सहा आरोपींना जेरबंद करण्यात यश आल्याचे पारस्कर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com