मला वेड लागले, या पोपटीचे...

alibaug-winter
alibaug-winter

अलिबाग - मस्त मस्त थंडीमध्ये वालाचे शिवार वाऱ्यावर झुलू लागले आहे... कोवळ्या नाजूक शेंगांमध्ये दाणा भरू लागला आहे... अशा वेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांच्या बेताचे शेतकरी, शहरी नागरिक, तरुण असो की ज्येष्ठ, सर्वांनाच वेड लागले आहे. 

कडाक्‍याच्या थंडीत रंगलेली गप्पांची मैफल... सोबत शेकोटीची धग, वालाच्या शेंगांचा आसमंतात मंदपणे दरवळणारा हलकासा सुगंध... सोबत, मसालेदार चिकन, कांदे-बटाट्याच्या लज्जतदार स्वादाची मेजवानी... अशा स्वर्गीय वातावरणाचे गारूड जिल्ह्याभर पसरले आहे. ‘मला वेड लागले... या पोपटीचे’ अशी अवस्था झालेल्या तरुणाईच्या तर ठिकठिकाणी वरचेवर पार्ट्या झडत आहेत. 

जिल्ह्यात थंडीचा जोर कायम आहे. बोचऱ्या थंडीत पोपटी पार्टीची गंमतच न्यारी. संध्याकाळी मित्रांची मस्त मांदियाळी जमा करायची. शेतातून वालाच्या शेंगा काढून आणायच्या. एकमेकांकडून पैसे जमा करायचे. चिकन, अंडी, कांदा, बटाटे दुकानातून विकत आणायचे. एखादा जुना माठ कुणाच्या तरी घरून मागून आणायचा व पोपटी पार्टीचा शेतात किंवा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी बेत आखायचा, अशी लगबग गावा-गावात दिसून येते. 

रात्री सर्व मित्र त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर पोपटी पार्टीला खरी सुरुवात होते. सर्वप्रथम वालाच्या शेंगा पाण्याने धुतल्या जातात. त्याचबरोबर चिकन, कांदा, बटाट्यांना उभ्या-आडव्या चिरा देऊन त्यामध्ये मसाला, तेल, मिठाचे मिश्रण भरले जाते. चिकनचे तुकडे केळीच्या पानात बांधण्यात येतात. माठाच्या तळाशी सर्वप्रथम भांबुर्डीचा पाला आणि मग थोड्या वालाच्या शेंगा पसरल्या जातात. एक थर झाला, की थोडे मीठ व काही चिकनचे तुकडे, बटाटे, कांदे त्या थरावर पसरतात. असे दोन थर लावले जातात. शेवटी पुन्हा भांबुर्डीचा पाला पसरून माठाचे तोंड झाकले जाते. त्यानंतर तीन विटांवर किंवा छोट्याशा खड्ड्यात मडके उलटे ठेवून सर्व बाजूंनी बारीक फाटी, थोडा पालापाचोळा मडक्‍याच्या वरपर्यंत लावला जातो. मग जाळ पेटवला जातो. तो साधारण अर्ध्या तासापर्यंत सुरू राहतो. या जाळाबरोबरच मित्रांच्या गप्पाही रंगतात. जाळाच्या धगीने बोचरी थंडी नाहीसी होते. मडके लालबुंद होते. जाळ विझला, की पोपटी तयार झाली आहे याची चाचणी घेऊनच मडके खाली उतरवले जाते. शेंगांचा घमघमाट सुटला की समजावे पोपटी तयार! 

जमिनीवर चटई किंवा कागद अंथरून गोलाकार पंगत बसते. मध्यभागी पोपटीची स्वर्गीय चवीची मेजवानी असते. गप्पांच्या फैरी झाडतच त्यावर सर्व जण तुटून पडतात.

‘पोपटी पार्टी’ म्हणजे रायगड जिल्ह्याची खास ओळख आहे. वालाच्या शेंगा शेतात भरून तयार व्हायला लागल्या, की पोपटी पार्ट्यांचा सिझन सुरु होतो, तो थेट थंडी संपेपर्यंत. वाफेवर शिजवलेल्या या पदार्थांचा स्वाद एकमेकांत उतरून जी भन्नाट चव येते ती फक्त चाखण्यासाठीच असते. त्यामुळे पोपटीची पार्टी सहसा कुणी टाळत नाही. आम्हा मित्र मंडळींची आठवड्यातून एक तरी पोपटी पार्टी होतेच. 
- संजय म्हात्रे 

पोपटी पार्टी म्हटली की आम्हा मित्रांसाठी एक मेजवानीच. साहित्य जमा करण्यापासून ते पोपटी पार्टी संपेपर्यंत एक वेगळीच मज्जा असते. मित्रांच्या गप्पाही रमतात. त्यामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा होते. सध्या पोपटीचा सीझन सुरू आहे. आम्ही नियमित पोपटी पार्टीची मजा लुटतो आहोत. 
- नरेंद्र पडवल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com