सावंतवाडीत सर्वच उमेदवारांमध्ये संभ्रम

अमोल टेंबकर : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

एकंदरीत सर्व परिस्थिती लक्षात घेता आज अर्ज छाननी प्रक्रियेनंतर काही प्रमाणात शहराचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात चौरंगी लढत होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शर्यतीत असलेल्या उमेदवारांना 11 नोव्हेबरपर्यंत अर्ज मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे. नाराजांना आणि बंडखोराना अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडून प्रयत्न होणार आहे. त्यानंतर अखेरचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सावंतवाडी - अर्ज छाननी प्रक्रियेनंतर येथील पालिकेचे चित्र काहीसे स्पष्ट झाले असून सद्यस्थितीत तरी बऱ्याच ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे. युती होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था असल्यामुळे सद्यस्थितीत इच्छुक उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत. याचा फटका प्रस्थापित आणि ताकदवान उमेदवार घेण्याच्या तयारीत आहेत.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अद्याप आपण युतीसाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे जाहीर करून युती अभंग राहणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ऐनवेळी युती झाल्यास आपल्या उमेदवारीचे काय होणार, समोरचा पक्ष कोणत्या जागेवर दावा करणार, असे विविध प्रश्‍न संबंधित उमेदवारांना भेडसावत आहेत. त्यामुळे अद्याप युतीचे उमेदवार मनापासून प्रचार करताना दिसत नाहीत. त्याचा फायदा शिवसेनेच्या प्रस्थापित लोकांनी घेण्यास सुरवात केला आहे. काही झाले तरी पालकमंत्री केसरकर आपल्या जागा सोडणार नाहीत, असा विश्‍वास मनाशी बाळगून ते कामाला लागले आहेत. ते नवख्या उमेदवारांना मात्र अप्रत्यक्षरित्या तुमचा पत्ता कट होणार असा संदेश पोचवत आहेत. यामुळे शिवसेनेसह भाजपमध्येही असेच संभ्रमाचे वातावरण आहे.

हा प्रकार लक्षात आल्याने भाजपचे नेते राजन तेली यांनी काल (ता. 1) झालेल्या पत्रकार परिषदेत आता काही झाले तरी माघार घेणार नाही. पक्षाचा आदेश आला तरी आता युती अशक्‍य आहे असे त्यांनी जाहीर केले आहे. भाजप आता सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात स्वबळावर लढण्याची तयारी करणार आहे, असे जाहीर केले आहे. एकंदरीत त्यांनी जरी दावा केला तरी युतीचा निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठांकडून केला जाणार आहे. त्यामुळे आयत्यावेळी नुकसान नको म्हणून "वेट ऍण्ड वॉच'च्या भूमिकेत बरेच उमेदवार आहेत.

तीच परिस्थिती कॉंग्रेस, राष्ट्रवादीत आहे. कॉंग्रेसने नगराध्यक्षपदावर दावा करीत सहा जागा राष्ट्रवादीला देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे ज्या जागा सोडायच्या आहेत त्या ठिकाणी नवखे उमेदवार दिले होते. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारात सुद्धा संभ्रमाचे वातावरण आहे. समोर राष्ट्रवादीतून उभ्या असलेल्या उमेदवारात सुद्धा तसेच वातावरण आहे.

Web Title: All candidates confused in Sawantwadi