पाली ग्रामपंचायतीच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले मागे

All candidates of Pali Gram Panchayat have withdrawn their application for candidature
All candidates of Pali Gram Panchayat have withdrawn their application for candidature

पाली : सुधागड तालुक्यातील पाली ग्रामपंचायत ही सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाते. या ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी (ता.२७) होणार होती. मात्र पाली नगरपंचायत स्थापन व्हावी यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.१६) अपक्षांसह सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अापले उमेदवारी अर्ज मागे घेतले अाणि पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

पालीच्या विकासासाठी नगरपंचायत व्हावी ही सर्व पालीकरांची इच्छा आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे सर्व पक्षाच्या नेत्यांनी व उमेदवारांनी सांगितले.

पालीच्या इतिहासात अशाप्रकारे सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते वसंत ओसवाल यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले, की पालीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालीकरांना नगरपंचायत हवी आहे. ग्रामपंचायतीला सर्वांचा विरोध असल्याने येत्या काळात पाली नगरपंचायत होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने याबाबत जलदगतीने अधिसुचना काढण्याकरीता आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करु. 

शेकाप नेते सुरेश खैरे म्हणाले, की पालीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त व्हावा याकरीता सर्वपक्षीय नेते, पालीकर नागरिकांनी स्वागतार्ह निर्णय घेत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्यानुसार सर्वपक्षीयांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. पाली नगरपंचायत होण्याकरीता न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. भाजप सुधागड तालुकाध्यक्ष राजेश मपारा म्हणाले, की पालीच्या विकासासाठी पाली नगरपंचायत होणे गरजेचे आहे. याबद्दल पालीकर जनतेचे व उमेदवारांचे सर्वप्रथम आभार मानतो. पाली नगरपंचायत होण्याच्या दृष्टीने हा पहिला व महत्वाचा टप्पा आहे. पाली नगरपंचायत होण्याकरीता सर्वप्रशासकीय अधिकार्‍यांच्या सहकार्याने शासनस्थरावर सर्वोतोपरी प्रयत्न केले.  

काँग्रेसच्या वतीने भूमिका मांडताना सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुध्द कुलकणी यांनी सांगितले, की पालीचा सर्वांगीण व सर्वकष विकास व्हायचा असेल तर ग्रामपंचायतीच्या तुटपुंज्या निधीतून विकास होणे अशक्य आहे. याकरीता नगरपंचायतीला प्राप्त होणारा भरीव निधीद्वाराच येथील नागरिकांना मुलभूत सेवा सुविधा मिळवून देण्याबरोबरच पालीसारख्या तीर्थस्थळाचा विकास घडवून आणला जाऊ शकतो.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, शेकाप नेते तथा जि.प सदस्य सुरेश खैरे, भाजप जिल्हा सरचिटणीस सुनिल दांडेकर, भाजप नेते विष्णू पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, भाजप सुधागड तालुकाध्यक्ष राजेश मपारा, काँग्रेस सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, मनसे सुधागड तालुका माजी अध्यक्ष संजय घोसाळकर, पाली सरपंच जनार्दन जोशी, पाली उपसरपंच सचिन जवके, अभिजीत चांदोरकर आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व पालीकर नागरिक उपस्थित होते.

बहिष्काराची वाटचाल...

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात ७ ते १२ मे रोजीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दिली होती अाणि २७ मे रोजी मतदान प्रक्रिया होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पाली गावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व पालीच्या सर्वांगीण विकासासाठी पालीकर जनतेसह सर्वपक्षीयांनी पाली नगरपंचायत व्हावी असे वाटत होते. 

त्यामुळे पाली ग्रामपंचायतीसाठी होणार्‍या निवडणुक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचे पालीत सोमवारी (ता.३०) एप्रिल सायंकाळी झालेल्या सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व पालीकर नागरिक यांच्या बैठकीत ठरले. त्यानुसार गुरुवारी (ता.३) मे पाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र या बहिष्कारापासून शिवसेना हा एकमेव पक्ष अलिप्त राहिला होता.

संभ्रमावर पडदा...

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवूनही उमेदवारी अर्ज भरण्यात आले. पाली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी ५४ सदस्य तर 4 सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 

परिणामी सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम वाढला होता. मात्र यामागील व्यूहरचना मात्र वेगळी होती. त्यानुसार शिवसेनेला बरोबर घेऊन रविवारी (ता.१३) सर्वपक्षीयांनी अपक्षांसह बैठक घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी (ता.१६) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाली ग्रामपंचायत निवडणुकीला अलविदा करीत शिवसेनेसह सर्वपक्षीय व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकला अाणि ही संभ्रमावस्था संपुष्टात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत शिवसेनेची भूमिका कुठल्याही पक्षाच्या राजकीय विचाराने न जाता जनमताचा कौल घेऊन ठरली. पालीची होऊ घातलेली नगरपंचायत शेकाप व अन्य पक्षामुळे गेली होती. त्यामुळे पालीकर जनतेमध्ये प्रचंड नाराजी व नैराश्य होते. नगरपंचायत स्थापन होण्याबाबत शिवसेनेने पालीकराचे जनमत घेतले. त्यानुसार पालीकर जनतेला नगरपंचायत हवी अाहे. परिणामी शिवसेनेने देखील ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

- प्रकाश देसाई, जिल्हा प्रमुख, शिवसेना - रायगड

पाली ग्रामपंचायत निवडणूक २७ मे रोजी पार पडणार होती. परंतु पाली ग्रामपंचायतीला विरोध दर्शवित सर्वपक्षीय नेते व उमेदवारांनी पालीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त व्हावा याकरीता उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. सर्वपक्षीयांनी केलेल्या मागणीचा व पालीकर जनतेच्या भावनांचा आदर राखत पाली नगरपंचायत होण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविला जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या आदेशाप्रमाणे पुढील काळात कार्यवाही केले जाईल.

- बी.एन. निंबाळकर, तहसीलदार, पाली-सुधागड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com