गुन्हेगाराची कुंडली आता 'येथे' उपलब्ध

राजेश शेळके
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगाराचे रेकॉर्ड मिळविणे कठीण. मात्र, या ॲप्लिकेशनमुळे आता हे सोपे झाले आहे.

रत्नागिरी - पोलिस दलाने आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे. जिल्ह्यात या ॲपच्या वापराला सुरवात झाली आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगाराचे रेकॉर्ड मिळविणे कठीण. मात्र, या ॲप्लिकेशनमुळे आता हे सोपे झाले आहे.

रेकॉर्डबरोबर गुन्हेगारावर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची व तारखांची माहितीही मोबाईलवरच मिळणार आहे. राज्यच नव्हे तर देशातील पोलिस दलासाठी हे ‘कोर्ट चेकर’  ॲप्लिकेशन सध्या उपलब्ध झाले आहे. कऱ्हाडातील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ॲप तयार केले आहे. ॲप कसे वापरायचे, याच्या कार्यशाळाही ठिकठिकाणी घेतल्या जात आहेत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती तत्काळ मिळावी, अशी पोलिसांची मागणी होती. 

हेही वाचा - काय सांगता ! सांगलीत पोलिस मुख्यालयासमोरच चोरीचा प्रकार  
 

फक्त पोलिसच करु शकतात ॲप्लिकेशनचा वापर

कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोर्ट चेकर’ हे ॲप्लिकेशन बनविले आहे. हे ॲप्लिकेशन बनविताना पोलिस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे ॲप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतरच त्याची डाऊनलोडची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलिस असला तरच ॲप्लिकेशमध्ये साईन इन करता येणार आहे. ऑनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय वापरता येणार नाही.

हेही वाचा - बिबट्याचे नख कारवाई दरम्यान सापडले संशयिताच्या घरात 

आरोपीचा फोटो टाकला तरी येणार रेकॉर्ड

कोर्ट चेकरमध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळू शकेल, असे नवीन फिचर त्यामध्ये आले आहे. 

वापर प्राथमिक स्तरावर
कोर्ट चेकर ॲप्लिकेशन जिल्ह्यात सुरू झाले आहे. त्याचा वापर प्राथमिक स्तरावर आहे. त्यामध्ये गुन्हेगारांचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आयसीजीएसचेही काम तेवढ्याच जोमाने सुरू आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांवर वॉच ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. 
- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Criminal Record Available To Police On Mobile In Court Checker