मालवणमध्ये सर्व हॉटेल रात्री अकरानंतर बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

मालवण - लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरासह तालुक्‍यातील चायनीज, हॉटेल, बीअर शॉपी, परमिटरूम व्यावसायिकांनी दुकाने रात्री अकरा वाजता बंद करावीत, अशा सूचना पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर यांनी व्यावसायिकांना दिल्या.

मालवण - लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरासह तालुक्‍यातील चायनीज, हॉटेल, बीअर शॉपी, परमिटरूम व्यावसायिकांनी दुकाने रात्री अकरा वाजता बंद करावीत, अशा सूचना पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर यांनी व्यावसायिकांना दिल्या. याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाईचेही सूतोवाच त्यांनी केले. 

निवडणूक काळात मद्य पिऊन हाणामारीचे प्रकार सातत्याने घडत असल्याने शहरासह तालुक्‍यातील चायनीज, हॉटेल, परमिटरूम, बिअर शॉपी व्यावसायिकांची पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी संजय गावडे, मनोज मोंडकर, आगोस्तीन डिसोझा, मेघा सावंत, सौ. कीर्तने, झुंजार हरमलकर, आबा केणी, शेखर गाड, बाळा पारकर, अवी सामंत, राजू डांटस, संतोष शिरगावकर, श्री. नेवगी यांच्यासह विविध व्यावसायिक उपस्थित होते. 

आचारसंहितेमुळे सर्व हॉटेल व्यावसायिकांनी रात्री अकरा वाजता आपला व्यवसाय बंद करणे आवश्‍यक आहे. याबाबतचा आदेश जिल्हा पोलिसप्रमुखांनी दिला आहे. त्यानुसार सर्व व्यावसायिकांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहकार्य करावे. रात्री अकरानंतर हॉटेल, चायनीज, परमिटरूम, बिअर शॉपी उघडी असल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. कारवाई टाळण्यासाठी आचारसंहिता संपेपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सवंडकर यांनी केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All hotels in Malvan are closed after 11 o clock