विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाही; जेलभरो आंदोलनात इशारा

विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाही; जेलभरो आंदोलनात इशारा

कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व विरोधक नेत्यांनी दिला. जिल्ह्यात येणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्धार सर्वांनी केला. यावेळी 264 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले.

पावसाळ्यात चौपदरीकरणाच्या दुर्दशाबाबत कणकवलीत आंदोलन झाले. जनतेचा उद्रेक झाला शासनाने मात्र हे आंदोलन चेपण्याचा प्रयत्न केला. या निषेधार्थ आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष,  महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने संत राऊळ महाराज महाविद्यालयासमोरील एस. एन. देसाई चौक येथे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी युती शासन प्रशासनाच्या विरोधात जेल भरो आंदोलन केले

दिलीप बिल्डकाँन या ठेकेदाराला आता मालवणी तडाका दाखवल्याशिवाय पर्याय नाही. आज गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले. त्यात कित्येकजण मृत्यूमुखी पडले. कित्येक जखमी झाले, मात्र पालकमंत्री, जिल्हाधिकारी याबाबतीत निष्क्रिय ठरले आहेत येथील लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे

- परशुराम उपरकर, माजी आमदार, मनसेचे सरचिटणीस

महामार्गाच्या दुरवस्थेबाबत पालकमंत्री दीपक केसरकर व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी आंदोलकांवर टीका टिपण्णी केली. ती जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. दोन वर्ष महामार्गाचे काम सुरू आहे, मात्र कोणते मुद्दे जनतेसमोर रेकॉर्डवर आणले नाही. सातत्याने आढावा बैठक घेऊ असे सांगणाऱ्यांनी कधीच आढावा घेतला नाही

- काका कुडाळकर   

मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत गेली वीस वर्षे मी काम केले. ते आमदार झाल्यानंतर राजकीय विश्वात एवढे रमले आहेत की त्यांनी आपल्या जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे. फक्त ते घोषणांचे मंत्री झालेले आहेत. कणकवलीत झालेल्या चिखलफेक आंदोलनातील सहभागी कार्यकर्त्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा असे म्हणणारे चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल खाते असताना त्यांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार काय

- बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडी

बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक आंदोलनात

दत्ता सामंत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने शिवसैनिक. त्यांनी आज या जेलभरो आंदोलनात सहभाग नोंदविला. श्री. सामंत म्हणाले, तोंडाने सांगून ऐकला नाही तर तोंडात मारून काम करून घ्या. ही बाळासाहेबांची शिकवण आम्ही आजही विसरलो नाही. मात्र दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक हे ज्या संस्कृतीतुन आले. ते ही शिकवण आचरणात कशी आणणार ?  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com