युतीसाठी एक पाऊल मागे येऊ - प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

वैभववाडी - शिवसेनेशी युती करण्याचे अधिकार आम्ही तालुका पातळीवर दिले आहेत. तुम्ही कुठेही मानापमान न ठेवता अतिशय सलोख्याने युती करा. आपला शत्रू काँग्रेस आहे. 

वैभववाडी - शिवसेनेशी युती करण्याचे अधिकार आम्ही तालुका पातळीवर दिले आहेत. तुम्ही कुठेही मानापमान न ठेवता अतिशय सलोख्याने युती करा. आपला शत्रू काँग्रेस आहे. 

शिवसेनेशी युती करताना दोन पाऊले मागे यायला लागले तरी वाईट वाटून घेऊ नका, आवश्‍यक त्या सर्व तडजोडी त्यांच्याशी करा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले. गेली पंधरा-वीस वर्षे जिल्ह्यात राणे काँग्रेसची सत्ता आहे. तरीदेखील खेड्यापाड्यात आवश्‍यक विकास झाला नाही, असे ही ते या वेळी म्हणाले. तालुका भाजपतर्फे येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यालयाचा प्रारंभ झाला. यापार्श्‍वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी युवा नेते संदेश पारकर, प्रमोद रावराणे, राजेंद्र राणे, बंडू मुंडल्ये, सीमा नानिवडेकर, हिरा पाटील, राधिका शेळके, दीपक पांचाळ आदी उपस्थित होते. या मेळाव्यात काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. श्री. जठार म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे जिल्ह्यात राणेंची सत्ता आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या त्यांच्याच समर्थकांच्या ताब्यात आहेत, मात्र इतकी वर्ष सत्ता उपभोगूनही  आजमितीस जिल्ह्याचा विकास झाला नाही. खेडोपाड्यात अद्याप पायाभूत सुविधा पोचलेल्या नाहीत. याला कारणीभूत असलेलेच आता निवडणुकीच्या प्रचारात आघाडीवर असणार आहेत. ही निवडणूक विकासाची प्रतीक्षा संपवणारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील राहून चालणार नाही. सत्तापिपासू काँग्रेसला रोखण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी.

सर्वसामान्य उमेदवारांनाचा उमेदवारी देण्यात येईल. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत विचारात घेऊनच निर्णय घेण्यात येणार आहे. ही निवडणूक आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेची असून प्रत्येक कार्यकर्त्याने आपआपला बूथ जिंकण्याची रणनीती आखावी. देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केलेल्या योजना लोकांपर्यत पोचल्या आहेत; मात्र लोकांपर्यत पोचण्यास आपले कार्यकर्ते कमी पडत आहेत.’’

अपप्रवृत्तींना थांबविणार
आमचा पक्ष लोकशाही मार्गाने चालणारा आहे, आमच्या पक्षात कुणालाही मारले जात नाही किंवा कुणाला मुंबईला नेऊन जाळले जात नाही. कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्या जात नाहीत आणि कुणाला कोंडूनही ठेवलं जात नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींना थांबविण्याची वेळ आता आली असून हे काम यापुढील काळात भाजप करणार आहे, असे मत श्री. जठार यांनी येथे व्यक्त केले.

गेली अनेक वर्षे राणे समर्थकांच्या ताब्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आहेत; परंतु या सत्तेचा उपयोग लोकांसाठी अजिबात झालेला नाही. भ्रष्टाचार करून करोडो रुपयांची माया या लोकांनी गोळा केली आहे. त्यांना या निवडणुकीत रोखण्याचे काम आपणाला करावयाचे आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची क्षमता भाजपमध्येच आहे. भाजप हा हुकूमशाही मार्गाने चालणारा पक्ष नाही. येथे कार्यकर्त्यांच्या विचाराला प्राधान्य दिले जाते. ही निवडणूक नेत्यांच्या नाही तर कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेची आहे.
- संदेश पारकर, युवा नेते

Web Title: Alliance to be a step behind