सुधागडसह रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

अमित गवळे
शनिवार, 27 जुलै 2019

 - सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे.

- त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते.

पाली : सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी (ता. 26) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले होते. परिणामी दोन्ही बाजूची वाहतूक दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. 27) दुपार नंतर देखील ठप्प झाली होती.

पाली आणि जांभुळपाडा पुलावरून पाणी गेल्याने वाकण वरून खोपोलीकडे जाणारी व खोपोली, पाली, वाकण कडे येणारी वाहने थांबविली होती. तसेच जांभुळपाडा पुलाचे संरक्षक कठडे देखील वाहून गेले. वाकण - पाली -  खोपोली मार्गावरून येणाऱ्या प्रवाश्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना जनसंपर्क अधिकारी रायगड यांनी दिल्या होत्या. 

नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाकण पाली मार्गावरील अंबा नदी पुल मार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी आणि वाहने याच मार्गावरून जातात. परिणामी येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून राहिले ज्यामुळे त्यांची गैरसोय झाली.

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. कोणतीही दुर्घटना घडू नये याकरीता तालुका प्रशासनाने पुर्णपणे खबरदारी घेत पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.  

तटकरे पिता-पुत्राला देखील मुसळधार पावसाचा फटका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचीत खासदार सुनील तटकरे व त्यांचा मुलगा विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांना देखील मुसळधार पावसाचा फटका बसला. शुक्रवारी (ता.26) रात्री मुंबईवरून खोपोली मार्गे ते कोलाड जवळील सुतारवाडी या आपल्या घरी जात होते. यावेळी जांभूळपाडा पुलावर पाण्याचा वेगवान प्रवाह आणि एकूणच पुलाची धोकादायक परिस्थिती पाहून तटकरे पिता- पुत्रांना  पुन्हा माघारी फिरत खोपोलीकडे जावे लागले.

दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.27) सकाळी पुलावरून काही प्रमाणात पाणी ओसरल्यावर ते सुतारवाडीला गेले. सर्वसामान्यांसह खासदार व आमदार यांना देखील मुसळधार पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले .

पालीतील रस्त्यांवर पाणी

मुसळधार पावसामुळे पालीतील नाले व गटारे तुडूंब भरून वाहत होते. त्यामुळे येथील आगर आळी, सोनार आळी, भोईआळी, बल्लाळेश्वर नगर, राम आळी, आदी ठिकाणी रस्त्यावरून पाणी गेले होते. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: along with sudhagadh raigad district observes heavy rain