अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

अमित गवळे
शनिवार, 7 जुलै 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शनिवारी (ता.7) जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी (ता.6) रात्रीपासून पावसाच्या संततधारेमुळे शनिवारी (ता.7) दुपारी साडेअकरा वाजताच्या दरम्यान वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली, जांभुळपाडा आणि तामसोली गावाजवळील अंबा नदी पुलावरुन पाणी गेले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.

नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाकण पाली मार्गावरील अंबा नदी पुल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी व वाहने याच मार्गावरून जातात. परिणामी येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यास प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून राहतात व त्यांची गैरसोय होते.

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. कोणतीही दुर्घटना घडू नये याकरीता तालुका प्रशासनाने पुर्णपणे खबरदारी घेत पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सुरक्षितता म्हणून अंबा नदी पुलावरुन होणारी दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. शाळा व कॉलेजमधे जाणारे तसेच घरी परतणारे विद्यार्थी, प्रवाशी व चाकरमानी अडकून पडले होते. त्यामुळे त्यांचे खूप हाल झाले.  तर अनेक वाहने देखिल पाण्यात फसली होती.

पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलावर पाली-सुधागड  तहसिलदार बि.एन. निंबाळकर व पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासन दोन्ही पुलांवर नागरीकांना आवश्यक ते सहकार्य करीत होते.

यावेळी पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे व नायब तहसिलदार वैशाली काकडे यांनी पाली पुलावर उपस्थीत राहून नागरीकांना सुरक्षिततेबाबत सुचना दिल्या.

सलग दोन दिवस मुसळधार पाऊस असल्याने पाली अंबा नदी पुलावर पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने व पुलावरुन पाणी जात असल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासनाने  योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये व अधिक सतर्क राहावे.
- बि.एन. निंबाळकर, पाली- तहसिलदार

Web Title: amba river crosses the limit