अंबा नदी प्रदूषणाच्या विळख्यात

अमित गवळे
Sunday, 24 February 2019

पाली : अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन पाली ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

पाली : अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन पाली ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यानंतर बंधारा कर्यान्वित करुन अंबा नदीचे पाणी अडविले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदुषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखील साठते. नदीवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखील पाणी खराब होते. परिणामी ते अधिक दुषित झाले आहे. या प्रदुषणामुळे पाण्याचा रंग पुर्णपणे गडद हिरवा व निळसर झाला आहे. पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. समग्र पालीकर पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी अंबा नदीच्या पाण्याचा वापर करतात. हे पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही नागरिकांना अधिकचे पैसे खर्च करुन पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा आधार घ्यावा लागतो.

शुद्ध पाणी केव्हा ?
पाली शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना मागील १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाने केलेल्या २००८ - ०९ च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाखाचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू राजकीय श्रेयवादामध्ये हि योजना रखडली गेली. त्याबरोबर १० टक्के लोकवर्गणीचा प्रश्न देखिल होता. मात्र पालीला ‘’ब’’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी ११ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. पण अजुनही हि योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. सर्वच राजकिय पक्ष व त्यांचे पुढारी या योजनेचे निवडणूकी पुरते भांडवल करतात. या सर्व पाणी समस्येबद्दल मागील साडेचार वर्षापासून सकाळ बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधत आहे.

''लवकरच साठवण टाक्यांजवळ फिल्टर बसविण्यात येतील. पाण्याची साठवणूक व्हावी व उन्हाळ्यात टंचाई निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी प्रमाणे नदीचे पाणी अडविले आहे. त्यामध्ये आता शेवाळ वाढली आहे. खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी नळाचे पाणी उकळून व गाळून वापरावे.''
- गणेश बाळके, सरपंच, ग्रूप ग्रामपंचायत पाली

आंबा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. पाली सारख्या तिर्थ क्षेत्रासाठी आलेली शुद्धपाणी योजना देखील लवकर कार्यान्वित केली जावी. तसेच नागरिकांनी देखील पाणी शुद्धिकरणाचे घरगुती उपाय केले पाहिजेत.
- सचिन कारखानीस, सुज्ञ नागरिक, पाली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amba River Pollution