अंबा नदी पुलावरुन चार दिवसांत तिसऱ्यांदा गेले पाणी

अमित गवळे
बुधवार, 11 जुलै 2018

मंगळवारी (ता. 10) दुपारी तीन नंतर पाली जवळील अंबा नदीपुलावरुन पाणी गेले. ते रात्री 8 वाजल्यानंतर उतरले. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजुकडे अडकेलेली वाहने व प्रवाशांना सोडण्यात आले. 

पाली - सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील पाली-वाकण मार्गावर अंबा नदी पुलावरुन मंगळवारी (ता. 10) पुन्हा एकदा पाणी गेले. त्यामुळे प्रवासी व वाहने पुलाच्या दोन्ही बाजुस अडकून पडली. परिणामी वाहतुक खोळंबून विद्यार्थी व प्रवाशांचे पुरते हाल झाले.

मंगळवारी (ता. 10) दुपारी तीन नंतर पाली जवळील अंबा नदीपुलावरुन पाणी गेले. ते रात्री 8 वाजल्यानंतर उतरले. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजुकडे अडकेलेली वाहने व प्रवाशांना सोडण्यात आले. तसेच वाकण पाली मार्गालगत व शेतामध्ये अंबा नदीचे पाणी आले होते. त्यामुळे तामसोली गावाला जोडणारा पुल देखील पाण्याखाली गेला होता. त्याबरोबरच वजरोली येथील एक मंदिर तसेच वाकण जवळील एक हाॅटेल देखील पाण्याखाली गेले होते. खबरदारी म्हणून पोलिसांनी वाकण नाक्यावरुन पाली-खोपोलीकडे जाणारी वाहतुक थांबविली होती.

मुसळधार पासवामुळे शनिवारी (ता. 7) सोमवारी (ता. 9) अाणि मंगळवारी (ता. 10) पाली येथील अंबा नदी पुलावरुन पाणी गेले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. वारंवार पाली पुलावरुन पाणी गेल्यामुळे चाकरमानी व विद्यार्थ्यांचे खुप हाल होतात. वाहतूकीला देखील खिळ बसते.

वाकण पाली मार्गावरील अंबा नदी पुल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी व वाहने याच मार्गावरून जातात. परिणामी येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यास प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून राहतात व त्यांची गैरसोय होते. त्यामुळे लवकर या ठिकाणी नव्या उंच व विस्तारीत पुलाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Amba rivers bridge is overflowed third time