आंबोली हिलस्टेशन वर्षा पर्यटन हंगामासाठी सज्ज

 आंबोली हिलस्टेशन वर्षा पर्यटन हंगामासाठी सज्ज

पावसाळी वर्षा पर्यटनासाठी आंबोली प्रसिध्द आहे. दरवर्षी याठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. यात गोवा व कर्नाटक राज्यातील पर्यटकांना आंबोली हे जवळचे पर्यटन स्थळ; मात्र अलिकडे हे पर्यटन स्थळ विविध समस्यांनी वेढले गेले आहे. याचा परिणाम म्हणून पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षात रोडावली आहे. प्रशासन याबाबत विविध उपाययोजना राबवत आहे; मात्र त्या यशस्वी होताना दिसत नाही. वर्षा पर्यटन हा येथील सगळ्यात मोठा हंगाम. हे हिलस्टेशन आगामी वर्षा पर्यटन हंगामासाठी सज्ज झाले आहे. यावर्षीच्या वर्षा पर्यटनासाठी प्रशानाने घेतलेली खबरदारी, केलेल्या उपाययोजना व समस्यांबाबत सकाळने घेतलेला हा आढावा... 

आंबोलीचे पर्यटन 
आंबाली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात या पर्यटन स्थळाकडे निसर्गसंपन्न ठिकाण म्हणून पाहिले जाते. येथील धबधबे, हिरवीगार वनराई, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, सनसेट पॉईंट, नांगरतास धबधबा व जवळच्या चौकुळ गावचे निसर्गसौंदर्य आदी पर्यटनस्थळे याठिकाणी पर्यटकांना भुरळ घालतात. गेल्या कित्येक वर्षात या पर्यटन स्थळांचा विकास अपेक्षित गतीने झालेला नाही. असे असले तरी जवळचे पर्यटन स्थळ म्हणून गोवा, कर्नाटक या राज्यांसह मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी या ठिकाणी भेटी देतात. 

वर्षा पर्यटनाचे आकर्षण 
येथे बारमाही पर्यटनाला पोषक घटक असले तरी पर्यटक याचठिकाणी खिळून राहतील, असा मोठा प्रकल्प नसल्याने इथल्या विकासाला मर्यादा आल्या; मात्र वर्षा पर्यटनाचा विचार करता, दिवसभराच्या विरंगुळ्यासाठी हे ठिकाण अनेकजण निवडतात. पावसाळ्याच्या सुरवातीपासून श्रावण महिन्यापर्यंत याठिकाणी दिवसाकाठी हजारो पर्यटक येतात. हा कालावधी येथील स्थानिक व्यावसाईकांचा आर्थिक ताळमेळीचा ठरतो. येथील घाटरस्त्यातील कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, धुक्‍यात हरवणारी इतर पर्यटन स्थळे व सोसाट्याचा वारा वर्षा पर्यटनाचे आकर्षण ठरते. याठिकाणी बारमाही पर्यटन उभे राहावे, यासाठी उपाययोजना होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नुसत्या घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. 

दरडीचा प्रश्‍न कायम 
थंड हवेचे ठिकाण प्रति महाबळेश्‍वर म्हणून प्रसिध्द असलेल्या आंबोलीची ओळख अलिकडच्या काळात कोसळणाऱ्या दरडीमुुळे पुसली जात आहे. पर्यटकांच्या मनात दरडीमुळे भीती निर्माण झाली आहे. पुर्वीचा वस ते मुख्य धबधबा यामधल्या अंतरावर दरडी कोसळण्याचे प्रकार काहीवेळा घडतात. आत्तापर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी याठिकाणच्या दरड कोसळणाऱ्या भागावर जाळी बसविण्याची आश्‍वासने दिली; मात्र ती हवेतच विरली. यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच दरडीचा भाग रस्त्यावर आल्याचा प्रकार घडला होता. सार्वजनिक बांधकामकडून यावर्षीही दरडीचा धोका नसल्याचेच सांगण्यात येत आहे; मात्र पावसाळ्यात दरडी कोसळल्यास त्या तात्काळ हटविण्यासाठी आठ ते दहा कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करण्यात आले असून एक जेसीबी मशिनही उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. 

पार्किंगची समस्या कायम 
आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता, याठिकाणी पार्किंगची बोंब दरवर्षी उद्‌भवते. परिणामी वाहतूक कोंडी होते. शनिवार व रविवारी वीक एंन्डच्या दिवशी तर ही समस्या जटील बनते. याठिकाणी पार्किंग तळ निर्माण करण्यासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आश्‍वासने दिली. राज्याजे माजी मुख्य सचिव जयेंद्र बाटिया यांनीही आंबोलीत बैठक घेत हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता. तसा प्रस्तावही शासन पातळीवर देण्यात आला; मात्र अद्यापही याबाबत कुठलीच हालचाल झाली नाही. गेल्यावर्षी पासून कर्नाटक, कोल्हापूर याठिकाणच्या पर्यटकांची वाहने आंबोली बाजारात अडवून पर्यटकांना तब्बल चार ते पाच किलोमीटर चालत धबधब्यावर पाठविले जाते. त्यामुळे लहान मुले व वृद्ध व्यक्‍तींचे हाल होतात. त्यामुळे धबधब्यावर पर्यटकांना उतरून वाहने पुन्हा बाजारपेठेत पार्किंगसाठी आणणे सोईचे होऊ शकते. 

मद्यपींना रोखणे अत्यंत गरजेचे 
आंबोलीचे पर्यटन अलिकडच्या काळात मद्यपी पर्यटकांमुळे बदनाम होत आहे. काही अतिउत्साही पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन करून धबधब्याच्या परिसरावर धिंगाणा घातला जातो. याचा त्रास बऱ्याच वेळा कुटुंबवत्सल पर्यटकांना सहन करावा लागतो. शिवाय मद्याच्या नशेत काही पर्यटकाकडून अतिउत्साहीपणा होत असल्याने यापूर्वी काही अप्रिय दुर्घटनाही याठिकाणी घडल्या आहेत. पोलिसांकडून अशा पर्यटकांना आवर घालण्यासाठी प्रभावी धोरण राबवणे गरजेचे आहे. 

चेंजींग रूम, शौचालयाची कमतरता 
आंबोलीत खास धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चेंजींग रूमची सोय याठिकाणी नसल्याने प्रामुख्याने महिला पर्यटकांमधून नाराजी व्यक़्त होत आहे. याठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली होती; मात्र ती बंद आहे. पर्यटनस्थळी शौचालयही नसल्याने पर्यटकांचे मोठे हाल होतात. त्यामुळे ही सुविधा याठिकाणी करणे क्रमप्राप्त आहे. 
 
रिप्लेक्‍टरची कमतरता 
आंबोली घाटरस्ता हा दाटीवाटीचा व वळणावळणाचा असल्याने रस्त्याच्या समोरील दिशा समजण्यासाठी रात्रीच्या वेळी वाहनचालकाला रिप्लेक्‍टरची आवश्‍यकता असते; मात्र बांधकाम विभागाने पावसाळा सुरू झाला तरी घाटात ते बसविले नाही. दिशादर्शक फलकही गंजले आहेत तर काहीवर बुरशी धरल्याने ते दिसेनासे झाले आहेत. याचा फटका वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटक वाहन चालकांना सोसावा लागणार आहे. 

रस्त्यावरील खड्ड्यातून सुटका 
आंबोली घाटरस्ता हा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. रेडी ते संकेश्‍वर या रस्त्याचा त्यात समावेश आहे. पुढील वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग आंबोली घाटरस्त्याचे काम करणार आहे; मात्र यावर्षी बांधकाम विभागाने रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केल्याने वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटक वाहन चालकांना खड्ड्यातून सुटका मिळणार आहे. गेल्यावर्षी या खड्ड्यामुळे अनेक छोटे, मोठे अपघातात याठिकाणी घडले होते. 

संरक्षक कठड्यांची पुर्नबांधणी 
आंबोली घाटात दरीच्या बाजूने कठड्याला लागून जीओ या खासगी मोबाईल कंपनीने केबल टाकण्यासाठी खोदाई केली आहे. कठड्याला लागून चर खोदल्याने ब्रिटिशकालीन कठड्यांच्या पायाला धक्का बसला आहे. त्यामुळे संरक्षक कठडे धोकादायक बनले आहेत. अलिकडे यामुळे दोन अपघात घडल्याचे उदाहरण ताजे असून यावर्षीच्या वर्षा पर्यटनात याचा धोका संभवू शकतो. बांधकाम विभागाने याबाबत कोणतीही खबरदारी घेतली नसून कठडे सुरक्षित असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. बांधकामने रस्त्याच्या डांबरीकरणासोबत वाहतुकीला धोकादायक ठरणारे व कोसळलेल्या संरक्षक कठड्याचे काम यावर्षी केल्याने वाहन चालकांतून समाधान व्यक्‍त होत आहे. गेल्या वर्षी तुटलेल्या कठड्याच्या ठिकाणी ट्रक दरीत कोसळण्याचा प्रकार घडला होता. याची दखल घेत बांधकामने असे धोकादायक ठरु शकणारे कठडे यावर्षी नव्याने उभारल आहेत. दरम्यान, यावर्षी हा धोका नसला तरी काही ठिकाणी संरक्षक कठडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत व काही तुटलेले आहेत. त्यामुळे हा धोका कायम आहे. 

चाळीस फुटाच्या मोरीची डागडूजी 
आंबोली घाटात असलेली चाळीस फुटाची मोरी अवजड वाहतुकीसाठी कमकुवत झाल्याने बांधकाम विभागाने ती दुरूस्तीसाठी घेतली आहे. सद्यस्थितीत या मोरीचे काही अंशी काम पूर्ण झाले असून वर्षा पर्यटनाच्या पार्श्‍वभूमीवर तात्पुरती डागजुडी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या मोरीचे काम पूर्ण झाल्यावरच याठिकाणावरून अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार आहे; मात्र वर्षा पर्यटनावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. 

पोलिस यंत्रणा सज्ज 
आंबोली वर्षा पर्यटनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, सावंतवाडी पोलिसांकडून नियोजनवर भर देण्यात आला आहे. यामध्ये पार्किंग समस्या व वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन उपाययोजना केल्या आहेत. यात बाजारपेठ जवळील पर्यटन महामंडळाच्या जागेत व धबधब्याच्या परिसरात पार्किंग करण्यात येणार आहे. धबधब्या परिसरात शनिवारी व रविवारी जादा पोलिस कुमक मागविण्यात येणार असून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. 

दारू रोखण्यासाठी नाकाबंदी 
सावंतवाडी, दाणोली, बावळाट याठिकाणी व आजरा फाटा येथे नाकाबंदी करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी गाड्यांची तपासणी होणार आहे. पर्यटक चोरट्या प्रकारे आणणारी दारू रोखण्यासाठी हा उपाय असणार आहे. या माध्यमातून मद्यपींवर आवर घालण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहे. 

कावळेसादवर पोलिस बंदोबस्त 
कावळेसाद पॉईंट हा आंबोली येथील पर्यटन पर्यटकांची गर्दी असणारे दोन नंबरचे पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी असलेल्या दरीत अलिकडच्या काळात अपघाताचे प्रमाण वाढले होते. अतिउत्साही पर्यटकाकडून रेंलिगवर चढून दरीत डोकावण्याचे, जीवावर बेतणारे प्रकार मोठ्या संख्येने होत असतात. त्यामुळे अपघाताची शक्‍यता लक्षात घेता यावर्षी सहा पोलिस कर्मचारी याठिकाणी नेमण्यात येणार आहेत. हे कर्मचारी शनिवार व रविवारी या दिवशी असतील. 

""आंबोलीत वर्षा पर्यटनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आमचा यावर्षी कटाक्ष असणार आहे. आवश्‍यक तेथे जादा पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय स्थानिक ग्रामस्थांचीही मदत पोलिस घेणार आहे. अतिउत्साही व धांगड धिंगाणा करणाऱ्या पर्यटकांची गय करण्यात येणार नसून वर्षा पर्यटन सुरळीत पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.'' 
- सुनिल धनावडे,
पोलिस निरिक्षक सावंतवाडी. 

""वर्षा पर्यटन सुरळीत होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक सर्व प्रयत्न आम्ही केले आहेत. दरडीबाबतही आम्ही वेळोवेळी काळजी घेणार आहोत. काही कामे राहिली आहेत. तीही पूर्ण करण्यात येणार आहेत. आपत्कालीन घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही सज्ज असणार आहोत.'' 
- ए. के. निकम,
उपअंभियता, सार्वजनिक बांधकाम विभाग. 

""आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांची पार्किंग व्यवस्थेबरोबर चेंजींग रूमची वानवा याठिकाणी आहे. त्यामुळे पर्यटक नाराज आहेत. पर्यटकांकडून होणारा कचराही मोठी समस्या बनली आहे. या सर्व मुद्दावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तोडगा काढला पाहिजे. अन्यथा, इथल्या पर्यटनाला बकालपणा येईल व निसर्ग दूषित होईल.'' 
- काका भिसे,
दुकान व्यावसाईक 

""वर्षा पर्यटनावेळी पोलिस प्रशासन चौकुळ रस्त्यावर करत असलेल्या पार्किगमुळे चौकुळेचे पर्यटन लुप्त पावत आहे. पार्किगमुळे चौकुळकडे जाणारा रस्ता जाम होत असल्याने याठिकाणच्या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांना पोहचता येत नाही. यावर योग्य निर्णय होणे गरजेचे आहे.'' 
- रूपेश गावडे,
हॉटेल व्यावसाईक चौकुळ. 

""वर्षा पर्यटनाच्या दृष्टीने वनविभाग व पारपोली संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून घाटातील धबधबे स्वच्छ करण्यात आले आहेत. धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना व्यवस्थित उभे राहता येईल. यासाठी दगड मांडण्यात आले आहेत. पर्यटकांना शौचालयाची सोय उपलब्ध केली जाणार आहे. चेंजिंग रूमचे खराब झालेले दरवाजे येत्या दोन दिवसात बसवून ही सोयही उपलब्ध करण्यात येणार आहे. दर आठवड्यातून दहा जणांची टीम धबधबा व परिसरातील कचरा साफ करणार आहे.'' 
- दिगंबर जाधव,
वनक्षेत्रपाल,आंबोली 

""आंबोली घाट तेथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरलेला आहे; मात्र एक पर्यटक म्हणून इथे असलेल्या पायाभूत सुविधांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. धबधब्याजवळ नियोजनाअभावी होणारी गर्दी, त्याचा होणारा त्रास याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, दरड कोसळण्याचे प्रमाण कसे कमी होईल, याकडे प्रशासनाने नियोजनात्मक लक्ष घालून अपघाताचे प्रमाण कमी केल्यास इथे येणाऱ्या पर्यटकाला स्वर्गाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. आंबोली घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी अजून काही व्हीव पॉईंट असायला हवेत. 
- बाळासाहेब गाढवे,
पर्यटक, परभणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com