वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत खडा पहारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

आंबोली / सावंतवाडी - आंबोली वर्षा पर्यटनासाठी येथील पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी दर शनिवार-रविवारी घाटातून अवजड वाहतूक रोखण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.

आंबोली / सावंतवाडी - आंबोली वर्षा पर्यटनासाठी येथील पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी दर शनिवार-रविवारी घाटातून अवजड वाहतूक रोखण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.
पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर आंबोलीकडे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्षा पर्यटनाच्या पर्यटकांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी तयारी केली आहे. आज पोलिस निरीक्षक सुनील धनावडे, सहायक निरीक्षक अरुण जाधव व वाहतूक निरीक्षक मुल्ला तसेच २५ कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. आंबोली चेकपोस्टवर हवालदार प्रकाश कदम, विश्‍वास सावंत, गुरू तेली, सर्फराज मुजावर कार्यरत होते. रविवारी बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

गस्तीसाठी सहायक निरीक्षक अरुण जाधव व पथकासाठी एक पेट्रोलिंग गाडी ठेवण्यात आली आहे. या शिवाय एक वनपाल व तीन कर्मचारी वनखात्याने मुख्य धबधब्याजवळ ठेवले आहेत. इतर दोन धबधब्यांकडे जाण्यासाठी गेल्यावर्षी पायवाटा करण्यात आल्या होत्या. या वर्षी मात्र इतर धबधब्यांकडे जाण्यासाठी व्यवस्था नाही. मुख्य धबधब्याकडे जास्त गर्दी होते. पार्किंग व्यवस्थेकडेही लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे घाटात वाहतूक कोंडी होणार नाही, याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत श्री. धनावडे म्हणाले, ‘‘दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी सुद्धा आंबोलीत वर्षा पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न काही अंशी सोडविण्यास मदत होणार आहे. तरीही शनिवार आणि रविवारसह सुटीच्या दिवशी घाटातून येणारी जाणारी अवजड वाहतूक रोखण्यात येणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. सुटीच्या दिवशी पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे. मद्यधुंद पर्यटकांना आवर घालण्यासाठी खास पथके तयार करण्यात आली आहेत. ती पथके घाटात गस्त घालणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आंबोली ग्रामस्थांची मदत घेण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा देण्याच्या सूचना तेथील वैद्यकीय यंत्रणेला करण्यात आल्या आहेत. १०८ रुग्णवाहिकेचीसुद्धा मदत घेण्यात येणार आहे.’’

दारूसाठा जप्त होणार
आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी दाखल होणाऱ्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात दारू आणली जाते. मद्यधुंद अवस्थेत पर्यटकांचे धूमशान सुरू असते. ते रोखण्यासाठी दाणोली, आंबोलीच्या ठिकाणी नाकाबंदी करुन पर्यटकांकडे असलेला दारूसाठा जप्त करण्यात येणार आहे.

‘‘वर्षा पर्यटनासाठी कोल्हापूर, बेळगाव आणि गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांनी पोलिसांना आणि अन्य पर्यटकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. या वेळी अतिउत्साहीपणा करणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्यात येणार आहे. त्यामुळे अनुचित प्रकार रोखण्यासाठी पर्यटकांनी पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.’’
- सुनील धनावडे, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी

Web Title: amboli konkan news police bandobast for tourist