आंबोलीत पावसाची 'शंभरी'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

आंबोली : राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत पावसाने इंचांचे शतक ओलांडले आहे. आतापर्यंत 104 इंच पाऊस झाला. या वर्षी उशिरा सुरवात होऊन पावसाची स्थिती समाधानकारक आहे.
 

आंबोली : राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत पावसाने इंचांचे शतक ओलांडले आहे. आतापर्यंत 104 इंच पाऊस झाला. या वर्षी उशिरा सुरवात होऊन पावसाची स्थिती समाधानकारक आहे.
 

सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून आंबोलीची ख्याती आहे. सह्याद्रीच्या कड्यावरील हिलस्टेशन असलेल्या आंबोलीत वाऱ्यांमुळे पावसाचा जोर जास्त असतो. थंड वातावरणामुळे येथे पावसाचे वेगळेपण ठळक दिसते. पावसाच्या प्रमाणाबाबत आंबोलीचा देशातील टॉप फाइव्हमध्ये क्रमांक लागतो. येरव्ही येथे 200 इंचांच्या खाली कधी पाऊस झाला नाही. गेल्या वर्षी राज्यात सगळीकडे दुष्काळी परिस्थिती होती. या वेळी पहिल्यांदाच 180 इंच इतका पाऊस झाला होता. गेल्या वर्षी 27 जुलैला 100 इंच पाऊस झाला होता; मात्र या वर्षी पावसाची सुरवात उशिरा होऊनही तो दमदार कोसळला. यामुळे शंभरी गतवर्षीच्या तुलनेत लवकर गाठली; मात्र त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत हे पावसाचे प्रमाण बरोबर आहे. या वर्षी येथे 25 जूननंतर पावसाचा जोर आहे. आंबोलीत आतापर्यंत 104 इंच पाऊस झाला. या वर्षी पावसाचे प्रमाण स्थिर आहे. त्यामुळे जवळपास 300 इंचांपर्यंत पाऊस जाईल, असा अंदाज पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी व्यक्त केला.
 

सध्या पावसाचा जोर कायम असल्याने पर्यटकांची संख्याही बऱ्यापैकी आहे. धबधबे उसळून वाहत आहेत. राज्याच्या विविध भागांतून पर्यटकही वर्षा पर्यटनासाठी दाखल होत आहेत. आंबोलीतील पावसाचे पाणी हिरण्यकेशी नदीने आजरा म्हणजे पश्‍चिम महाराष्ट्रात जाते, तर घाटातील धबधब्यांचे पाणी दाणोली बांदा येथून तेरेखोलमार्गे समुद्राला मिळते.

Web Title: Amboli rain 'centenary'