आंबोलीत पाऊस पोचला 240 इंचांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

आंबोली - येथे आतापर्यंत 240 इंच इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे.

आंबोली - येथे आतापर्यंत 240 इंच इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे.

राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख आहे. येथे पडणाऱ्या पावसावर येथील पर्यटनही अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांमध्ये वर्षा पर्यटनाचा आनंद घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सुरवातीच्या टप्प्यात दमदार पाऊस होऊन धबधबे लवकर सुरू झाले तर वर्षा पर्यटनासाठी जास्त काळ मिळतो. याचा इथल्या पर्यटन व्यवसायाला फायदा होतो. त्यामुळे पाऊस हा येथील अर्थकारणाचाही मुख्य भाग बनला आहे.
देशभरात जास्त पाऊस पडणाऱ्या बहुसंख्य ठिकाणी गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण घटत आहे. आंबोलीत मात्र तशी स्थिती नाही. असे असले तरी गेल्या वर्षी येथे पावसाचे प्रमाण कमी झाले होते. यंदा पावसाने दमदार हजेरी लावत आतापर्यंत 240 इंच इतका टप्पा गाठला आहे.

गेल्या काही वर्षांची तुलना करता 250 इंचांपेक्षा कमी पाऊस येथे कधीच झाला नव्हता. 2014 मध्ये 283 आणि गेल्या वर्षी अवघा 180 इंच पाऊस झाला होता. या वर्षी आतापर्यंत 240 इंचांचा टप्पा गाठला गेला आहे. त्यामुळे 31 ऑक्‍टोबरपर्यंत हे प्रमाण पावणेतीनशे इंचांच्या आसपास पोचेल, असा अंदाज येथील पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी व्यक्त केला.

मध्यम पावसाची चिन्हे
सह्याद्रीच्या उंच कड्यावर असल्याने येथे वाऱ्यांचा वेग जास्त असतो. समुद्र सपाटीकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे येथे तिरपा पाऊस पडतो. यातच धुक्‍याची चादर ओढली गेल्याने आंबोलीतील पावसाचा आनंद पर्यटकांना वेगळी अनुभूती देऊन जातो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या आठवडाभरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Ambolita reached 240 inches of rain