ambulance driver good work konkan sindhudurg
ambulance driver good work konkan sindhudurg

भावांनो जिंकला! करोना संकटात 27 रुग्णवाहिका चालकांची कामगिरी गौरवास्पद

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्यासह 108 रुग्णवाहिकेतील चालकांचे योगदानही महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणण्यापासून ते डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यापर्यंत 108 रुग्णवाहिका कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मार्च ते आतापर्यंत 108 रुग्णवाहिकेतून 2 हजार 321 कोरोना संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणले आहे.

यात 30 कोरोना 38 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत अपघात, गरोदर स्त्री, आत्महत्या, वीज पडणे यांसह अन्य 12 हजार 495 रुग्णांना सेवा देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. कोरोना लढ्यात डॉक्‍टर, पोलिस, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांसह अन्य शासकीय कर्मचारी उतरले आहेत. या लढ्यात 108 रुग्णवाहिका कर्मचारीही सहभागी आहेत. जिल्ह्यात 108 च्या 12 रुग्णवाहिका आहेत. कणकवली, कासार्डे, वैभववाडी, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील रुग्णालयात या रुग्णवाहिका आहेत.

या रुग्णवाहिकामध्ये 27 चालक आहेत. कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईन केलेल्या ठिकाणावरून जिल्हा रुग्णालयात आणण्याचे काम 108चे "पायलट' करत आहेत. सध्या कोरोनामुळे शहरी भागातून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत या रुग्णवाहिका जात आहेत. साधारणपणे एक रुग्णवाहिका 175 ते 200 किलोमीटर प्रवास करीत आहे. जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या पाहता आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. त्यामुळे आणखीन 5 रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळाव्यात, अशी मागणी स्थानिक रुग्णालय प्रशासनाने आरोग्य संचालक यांच्याकडे केली आहे. 

योद्‌ध्यांचा विचार व्हावा 
कोरोनावर भविष्यात निश्‍चित मात करू; परंतु या कठीण परिस्थितीत ज्यांनी जीव धोक्‍यात घालून इतरांचा जीव वाचविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. अशा योद्‌ध्यांना शासनाने विसरू नये. रुग्णवाहिकेचे चालक सध्या कॉन्ट्रॅक्‍ट बेसवर आहेत. भविष्यात शासकीय सेवेत कायमस्वरूपी करून घ्यावे, अशी एक माफक इच्छा या रुग्णवाहिका चालकांकडून व्यक्त केली जात आहे. 

तापमान, त्यात पीपीई किट 
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. अंगाची ल्हाई ल्हाई होत आहे. जिल्ह्यात 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याच्या नोंदी आहेत. त्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. यामुळे 108 रुग्णवाहिकेतील कर्मचारी स्वरक्षणासाठी 14 ते 15 तास पीपीई किट घालून डॉक्‍टरांसोबत संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांना आणावे लागत आहे. 

पूरस्थितीतही महत्त्वाची भूमिका 
गतवर्षीच्या महापूर आठवला, की आजही धडकी भरते. अशा पूरस्थितीत 108 च्या चालकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून कमरेएवढ्या पाण्यात रुग्णवाहिका घालून अनेकांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे या योद्धांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा गौरव व्हावा, असे काहींनी मत व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com